रविवार, 20 रोजी मराठा समाजाची निर्णायक बैठक पार पडणार असून, शेवटची बैठक आहे. या बैठकीत निवडणूक लढायचं ठरलं तर फॉर्म भरायचे आहेत, नाही ठरलं तर उमेदवार पाडायचे ठरवणार असून, भाजपा आम्हाला संपवायला निघालीय. भाजपला संपविण्यात मोठा विजय असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
13 महिन्यांपासून मराठे एकत्र आल्याने एकही चुकीचा फटका बसला नाही पाहिजे. आम्ही राजकारण नाही. सामाजिक म्हणून एकत्र आलो. आम्हाला नाईलाजाने राजकीय रस्त्यावर आणले. समाज संपविण्यासाठी निघालेल्यांना हरविणेसुद्धा लढण्यापेक्षा मोठा विजय असल्याचेही त्यांनी सांगितले. आम्हाला तयारी करण्यासाठी वेळ कमी आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेण्याच्या तयारीत आहोत. जो निर्णय होईल त्याची घराघरात मराठा समाज वाट पाहत आहे, असेही जरांगे पाटील म्हणाले.
पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की, आज वकील, राजकीय अभ्यासक यांची बैठक घेऊन सल्ला घेण्यात आला. समाजाला, मला वेळ आहे. पण प्रक्रियेला वेळ नाही. मी तयार आहे, समाजसुद्धा तयार आहे, फक्त समाजाला सांगायचं आहे. लढायचं ठरलं तर प्रचाराचं टेन्शन नाही. म्हणून तीन महिन्यांपासून सांगतोय, तुम्ही सावध रहा. सगळ्यांनी आपले कागदपत्र काढून ठेवा. उद्या लढणं होईल नाहीतर पाडणं होईल, असेही त्यांनी सांगितले.
काहीच लफडं नको…
स्वबळावर लढणार की युती करणार? असा सवाल जरांगे यांना करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, सगळं उद्या ठरेल. कुणाच्या सोबत जाणार नाही, सगळे लोक यांना कदरले आहेत हे मात्र नक्की. काहीच लफडं नको. ठरलं तर अपक्ष म्हणून दणका हाणून द्यायचा. या पाच वर्षात सहा पक्ष सत्तेत बसलेत. हे देशात पहिल्यांदाच झालं आहे. फडणवीस मारेकरी आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.