कुणालाही पाठिंबा नाही, उमेदवारही देणार नाही! मनोज जरांगे यांची भूमिका जाहीर

ज्याला पाडायचे त्याला पाडा, ज्याला निवडून द्यायचे आहे त्याला निवडून द्या, पण मत देताना ज्यांनी आपला विश्वासघात केला, आपल्या आयाबहिणींवर लाठय़ा चालवल्या त्यांना विसरू नका

लोकसभा निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नाही आणि अपक्ष उमेदवारही उभा करणार नाही, अशी घोषणा मनोज जरांगे-पाटील यांनी केली. ज्याला पाडायचे आहे त्याला पाडा, ज्याला निवडून द्यायचे आहे त्याला निवडून द्या, पण मत देताना ज्यांनी आपला विश्वासघात केला, आपल्या आयाबहिणींवर लाठय़ा चालवल्या त्यांना विसरू नका, आयाबहिणींच्या पाठीवर पोलिसांनी उठवलेले वळ विसरू नका, असेही ते म्हणाले.

30 मार्च रोजी लोकसभा निवडणूक, मराठा उमेदवार यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले होते. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आंतरवाली सराटीकडे लागले होते. राज्यभरातील मराठा समाजाकडून मागवलेला अहवाल, समाजातील प्रतिष्ठतांकडून मागवलेले मत याचा साकल्याने विचार केल्यानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना लोकसभा निवडणुकीत कोणालाही पाठिंबा न देण्याची स्पष्ट भूमिका असल्याचे सांगितले. अपक्ष उमेदवारही देणार नाही, असेही ते म्हणाले. मात्र मतदान करताना आरक्षणाच्या मुद्दय़ावर मराठा समाजाचा विश्वासघात झाला, आपल्या निष्पाप आयाबहिणींवर अमानुषपणे लाठय़ा चालवण्यात आल्या याचा विसर पडू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले. राजकारणापेक्षाही आरक्षण महत्त्वाचे आहे. समाजाची एकी अभंग राहणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे राजकारणापासून दूरच राहण्याचा निर्णय आपण घेतला आहे, असेही मनोज जरांगे म्हणाले.

मराठा समाजाची कळकळीची विनंती

मनोज जरांगे यांनी प्रत्येक जिह्यातील मराठा समाजाकडून मत मागवले होते. आज दिवसभर या अहवालावरच चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले तर आपसातच संघर्ष होण्याची भीती आहे. n मनोज जरांगे यांच्या अफाट लोकप्रियतेचा फायदा घेऊन काही जणांना लोकसभेत जाण्याचे स्वप्न पडले आहे. अशांनी आपली नावे पुढे केली आहेत. आरक्षणाच्या आंदोलनाला आतापर्यंत राजकारणाचा स्पर्श झालेला नाही, परंतु उमेदवार उभे केल्यास समाजात दुहीचे बीज पेरले जाईल.

समाजाचे प्रतिनिधी ठरण्याऐवजी नात्यागोत्याचे राजकारण यात घुसेल. या सगळय़ात मराठा समाजाचेच नुकसान होणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेऊ नये, अशी कळकळीची विनंती बहुतेक जिह्यांतील मराठा समाजाने केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आंबेडकर यांनाही प्रतिसाद नाही

दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली होती. या दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. या भेटीमुळे तिसऱ्या आघाडीची चर्चा रंगली होती, पण मनोज जरांगे-पाटील यांनी कोणालाही पाठिंबा न देण्याची भूमिका जाहीर केल्याने प्रकाश आंबेडकर यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले आहे.