दिलेला शब्द मोडाल तर मराठा वज्रमुठीची ताकद दाखवू!

मराठा समाजाने कधीही जातीयवाद केला नाही. अन्याय झाला म्हणून न्याय मागण्यासाठी मराठा समाज एकत्र आला आहे. आमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवा, आम्ही तुमच्या वाटेत येणार नाही. पण दिलेला शब्द मोडलात तर मराठा वज्रमुठीची ताकद येत्या विधानसभेत तुम्हाला दिसेल असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मिंधे सरकारला दिला. त्याचबरोबर मराठा समाजाने एकगठ्ठा मतदान करून आपली ताकद दाखवावी, असे आवाहनही त्यांनी बीडमध्ये आज मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीदरम्यान, केले.

राज्यात कुठेही आंदोलन झाले की शिष्टाईसाठी गिरीश महाजन यांना पाठवले जाते. महाजन गेले की आंदोलन मोडते, त्यात फुट पडते. महाजन हे माणसाला फसवतात. ते आंदोलन पह्डे मंत्री आहेत, असा हल्लाबोल मनोज जरांगे यांनी केला.