जरांगे यांचे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आंदोलन, राज्यभरात 5 सप्टेंबरपासून घोंगडी बैठक घेणार

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आम्ही आंदोलन हाती घेतले आहे. सरकार कसे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार नाही हे आम्ही बघतो. राज्यभरात 5 सप्टेंबरपासून घोंगडी बैठक घेऊन आंदोलनाबाबत पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आज आंतरवाली सराटी येथे दिली.

जरांगे-पाटील म्हणाले की, सरकार तात्पुरती घोषणा करत कपडे वाटप करून लोकांना विकत घेत आहे का? शेतकरीदेखील आमचाच आहे, सरकार लक्ष द्यायला तयार नाही. आम्ही या प्रश्नांत लक्ष घालणार असून सरकारला या प्रश्नावर नीट करणार आहे. 5 सप्टेंबरपासून गेवराई मतदार संघातून घोंगडी बैठकीला सुरुवात करणार असून आमची भूमिका लोकांसमोर मांडणार आहे. सगळय़ा समाजाचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जास्त ताकद लावणार असून घोंगडी बैठकीचा समारोप कुठे करायचा, याबाबत समाजाची भूमिका जाणून घेऊ, असेही जरांगे-पाटील म्हणाले.

पोलीस भरती प्रक्रियेसाठी जात प्रमाणपत्र काही जातीयवादी अधिकारी देत नाहीत. व्हॅलीडिटीसाठी 6 महिन्यांची मुदत द्यावी, अशी मागणी मी केली आहे. सरकारने देतो म्हणून सांगितले आहे, बघूया आता काय होते ते. क्युरेटिव्ह पिटिशनवर बोलताना सांगितले की, आमचे आरक्षण ओबीसीत आहे. दिल्लीशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. निवडणुकीपुरता त्यांना वेळ काढून न्यायचा होता. निवडणूक पुढे ढकलली आहे. सगळय़ांचा रोष सरकारला झोप येऊ देत नाही.

रात्री फडणवीस यांचे ड्रोन आले होते

रात्री इकडे ड्रोन आले होते ते फडणवीस यांचे ड्रोन आहेत. त्यांनीच हेरगिरी करायला ड्रोन ठेवले आहेत. तरीही फडणवीस तुम्ही काहीच करू शकणार नाही. तुमच्या ड्रोनने गोळ्या घातल्या तरी हरकत नाही, मी नसलो तरी माझा समाज लढाईसाठी तयार आहे, असेही जरांगे-पाटील यांनी सांगितले.