‘आरक्षणाचा लढा हा मराठा समाजाच्या अस्मितेचा लढा आहे. निवडणुका येतील आणि जातील; पण आरक्षणासाठी सुरू झालेला हा लढा थांबता कामा नये…’ विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या मराठा उमेदवारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील भावूक झाले.
आंतरवाली सराटी येथे सध्या विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या मराठा उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. जालना मतदारसंघातील इच्छुकांशी संवाद साधताना मनोज जरांगे हळवे झाले. मराठा आरक्षणाची लढाई ही आपल्या अस्मितेची लढाई आहे. निवडणुका येतील आणि जातील, पण आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेला हा लढा थांबता कामा नये, असे मनोज जरांगे म्हणाले. राज्यकत्र्यांना एवढ्या मोठ्या बलाढ्य समाजाचे दु:ख दिसत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
समाजाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. मराठा समाजाला संपवण्याचे कटकारस्थान शिजत आहे. त्यामुळे आपण एकजुटीने राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. मराठा समाजातील इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी मतदारसंघ आणि उमेदवार जाहीर करणार असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. इच्छुक कितीही असले तरी आमचा उमेदवार एकच असणार आहे. उमेदवार जाहीर झाल्यानंतर फक्त त्याचाच अर्ज राहील, इतरांना बिनबोभाट अर्ज मागे घ्यायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.