उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचं वाटोळं केलं, अशी तोफ आज पुन्हा एकदा मनोज जरांगे-पाटील यांनी डागली. फडणवीसांकडून मराठ्यांचं शोषण केलं जात आहे. आंतरवाली सराटीकडे येणारा रस्ता बंद करून गावातून जाऊ नका असे सांगितले जात आहे. आम्हाला वाळीत टाकल्यासारखी स्थिती आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. मराठा समाज आणखी अन्याय सहन करणार नाही. जशास तसे उत्तर मिळेल, असे जरांगेंनी ठणकावले. मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नाही, असे त्यांनी उपोषणाच्या सहाव्या दिवशी सांगितले.
उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी लवकरच बैठक घेऊन मागण्या मान्य कराव्यात. मराठे आता चर्चा नको अंमलबजावणी हवी, अशी ठोस भूमिका मनोज जरांगे-पाटील यांनी घेतली. ओबीसी आंदोलन केवळ भांडण उकरून काढण्यासाठी असल्याचा आरोप करून आज आमचा रस्ता बंद करणाऱ्या सरकारचा रस्ता आम्ही उद्या बंद करू, असा इशाराही त्यांनी दिला.
जरांगे म्हणाले की, आता संपर्क नको. आम्हाला अंमलबजावणी हवी आहे. आम्ही अन्याय सहन करण्याच्या बाहेर आहोत. मुंबई आंदोलनाविषयी मला माहीत नाही. मुंबईला ‘वर्षा’वर बैठकीची मला कल्पना नाही. कोण तज्ञ या बैठकीत आहेत, बैठक पाकिस्तानमध्ये होणार की कुठे हे मला माहीत नाही. मराठ्यांवर सरकारकडून ठरवून अन्याय सुरू आहे, अन्याय किती करावा याची मर्यादा पाहिजे. ओबीसी -मराठा एकमेकांच्या अंगावर जात नसून एक-दोन नाटक कंपन्या आहेत. आम्हाला राजकारणात जायचे नाही म्हणून उपोषण सुरू आहे. फडणवीसांना ही मोठी संधी आहे. दोषी ते आहेत. नंतर त्यांना थोबाड उचकटता येणार नाही. एक किंवा दोन दिवसांत निर्णयाबाबाबत आम्ही आशावादी असल्याचे ते म्हणाले.
आंतरवाली सराटीकडे येणाऱ्या आमचा रस्ता बंद करून गावातून जाऊ नका असे सांगत आहेत. पूर्वी बौद्धांचे जसे शोषण झाले तसे आता मराठ्यांचे होत आहे. बौद्धांना जसे वाळीत टाकले जात होते तसेच आमचे होत आहे. दवाखाना, शाळा आणि कॉलेजात जायचे रस्ते बंद केले आहेत. उद्या कोणी मेले, काही झाले तर दवाखान्यात जायचे कसे? आम्ही हे केले असते तर मराठ्यांनी अन्याय केला म्हणून बोंब मारली असती. फडणवीस आणि भुजबळ सरकार चालवतात का? आमचा रस्ता बंद करून त्या रस्त्याने गेलो तर मारत आहेत. आज आमचा रस्ता बंद आहे, उद्या आम्ही तुमचा रस्ता बंद करू, असा इशाराही त्यांनी दिला.
हे आंदोलन फडणवीसांमुळेच….
हे आंदोलन फडणवीस यांच्यासाठीच असल्याचा टोला जरांगे पाटील यांनी हाणला. मराठा समाजाला न्याय मिळाला नाही तर त्याचा दोष त्यांचाच असेल. येत्या तीन-चार दिवसांत यावर तोडगा निघेल, असा विश्वासही जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
सुरुवात तुम्ही केली शेवट मराठा करेल
आमच्या मुलाला मारहाण केली. सुरुवात त्यांनी केली शेवट मराठा करेल. फडणवीसांनी मराठ्यांचा रस्ता बंद केला, हा अन्याय नाही का? गोंदीचा अधिकारी जातीयवादी, कालपासून मराठ्यांना तू त्रास द्यायला लागला आहे. तुझ्यातील जात जागी झाली का? काही लोकांनी तुझ्या अंगावर डिझेल टाकले होते. आमच्या लोकांवर गुन्हे दाखल करतो का. तुझी जात जागी झाली का, आमचा रस्ता यांनी बंद केला. जर आम्ही केला असता तर हाच देवेंद्र फडणवीस म्हटला असता वाळीत टाकला म्हणून. आरक्षण मिळेपर्यंत शांत रहा, सगळय़ांचा हिशेब होणार आहे, असेही जरांगे पाटील म्हणाले.
तुम्ही मुख्यमंत्र्यांची तमाशा कंपनी आहे का?
वडीगोद्रीत ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचा चौथा दिवस आहे. यावेळी प्रा. हाके म्हणाले की, एखाद्या जातीला आरक्षण हवे असेल तर सर्व्हे करावा लागतो. जात मागास सिद्ध व्हावी लागते. मग कुठले आरक्षण द्यायचे हे ठरवले जाते. मराठा समाजानेही वारंवार आरक्षण नाकारले आहे. त्यांना कायदा मान्य नाही. मुख्यमंत्री, कोकणातल्या कुणबीचे नातेवाईक तामीळनाडू, गोवा राज्यामध्ये एस्सी, एसटीमध्ये येतात. सध्या सगळे बेकायदेशीर सुरू आहे. आम्ही सांगत असलेले कुणालाही मान्य नाही, असेही हाके म्हणाले. आम्ही भुजबळ यांची नाटक कंपनी असेल तर तुम्ही मुख्यमंत्र्यांची तमाशा कंपनी आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी जरांगे यांच्या वक्तव्यावर केला.
शंभुराजे देसाई हे मुख्यमंत्री, जरांगेमधील दलाल : वाघमारे
सातवी नापास असणारा माणूस राज्याचे मुख्यमंत्रीपद भोगतो. गुटखाखाऊ शंभुराज देसाई मुख्यमंत्री आणि जरांगे-पाटील यांच्यामधील दलाल असल्याचा आरोप नवनाथ वाघमारे यांनी आज केला. शंभुराज देसाई यांना ओबीसी आंदोलन दिसत नाही का? फक्त मराठा आंदोलनाचे निरोप घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जात असल्याचे वाघमारे म्हणाले.
आंदोलक शासकीय रुग्णालयात दाखल
सोनियानगर येथील मंगेश ससाणे त्यांच्यासह पाच जण अशा सहा जणांचा ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. उपोषणास बसलेल्या बाळासाहेब दखणेंची तब्येत खालावली आहे. त्यांना उपोषणस्थळावरून जालना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यावेळी मंगेश ससाणे म्हणाले की, राज्य सरकारने जानेवारी महिन्यात जरांगे-पाटील यांच्या दबावाला बळी पडून सगेसोयरे अध्यादेश काढला आहे. याचा फटका ओबीसींबरोबरच दलित आणि भटक्या समाजाला बसणार आहे. दलितांच्या आरक्षणाला बसलेला फटका राजरत्न आंबेडकर यांना चालेल का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
ही भुजबळांची नाटक कंपनी
आंतरवाली सराटी, वडीगोद्री येथे सुरू असलेल्या ओबीसींच्या आंदोलनावर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी टीका केली. त्यांचा लढा ओबीसींसाठी नाही, तर भांडण उकरून काढण्यासाठी आहे. ही भुजबळांची नाटक कंपनी असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. हेच जर मराठ्यांनी केले असते तर त्यांचा किती थयथयाट झाला असता? पायात घुंगरं घालून नाचले असते, असा टोला त्यांनी भुजबळांना लगावला.
मुख्यमंत्र्यांनी संविधानाच्या शपथेचा भंग केला : हाके
मुख्यमंत्र्यांनी संविधानाच्या शपथेचा भंग केला असून तुम्ही खरेच शिवरायांच्या आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक आहात का, असा सवाल ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला. एकनाथ शिंदे कोणत्या धुंदीत आहेत? त्यांच्याकडे पैशांचे खोके खूप आहेत आणि पैशांच्या खोक्याने मी पुन्हा मी मुख्यमंत्री होणार असे त्यांना वाटते. ते फक्त पाहुण्यांच्या आंदोलनाकडे लक्ष देत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कुणाच्या तरी ताटातलं काढून दुसऱ्याला वाढणार नाही, शिष्टमंडळापुढे सरकारची भूमिका
ओबीसींच्या आरक्षणातून कोणतेही आरक्षण काढलं जाणार नाही. त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. कोणाच्या तरी ताटातलं काढून दुसऱ्याला वाढायचं ही सरकारची भूमिका नाही, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सांगितले. मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलकांनी मुंबईत धडक मारली आहे. मंत्रालय आणि वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा मराठा आंदोलकांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली. या बैठकीत मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर शंभूराज देसाई यांनी झालेल्या चर्चेची माहिती माध्यम प्रतिनिधींना दिली. मराठा आंदोलकांच्या मागण्यांच्या संदर्भातील माहिती देताना ते म्हणाले की, मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली. त्याशिवाय मुंबई, हैदराबाद, सातारा गॅझेट लागू करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मराठा समाजाच्या मागण्यांवर उद्यापासून अधिक गतीने काम सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत, असे शंभुराज देसाई यांनी सांगितले.
आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात तसेच गॅझेट लागू करण्याच्या संदर्भात त्वरित कार्यवाही सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मला आणि मंत्री चंद्रकात पाटील यांना दिले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची प्रमुख मागणी आहे. हैदराबाद गॅझेट लागू करा, सगेसोयऱ्यांचे नोटिफिकेशन काढा या जरांगे यांच्या मागण्याचे ड्राफ्ट नोटिफिकेशन काढण्यावर चर्चा झाली.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे सुद्धा आंदोलन करीत आहेत. याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, ओबीसींच्या आरक्षणातून कोणतेही आरक्षण काढले जाणार नाही. त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. इतर समाजाच्या आरक्षणालाही धक्का लागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
जरांगेंनी प्रकृतीकडे लक्ष द्यावे
मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, मनोज जरांगे यांनी प्रकृतीकडे लक्ष द्यावे. त्यांची तब्येत महत्त्वाची असल्याचे शंभुराज देसाई यांनी सांगितले.