मनोज जरांगे पाटील हे परळी किंवा गेवराई विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सध्या आहे. मात्र खुद्द जरांगे यांनी याचा इन्कार केला असून आपण परळी, गेवराईच काय, राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचा स्पष्ट खुलासा केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 4 जूनपासून आंतरवाली सराटीत पुन्हा उपोषण सुरू करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हिंगोली दौर्यावर असतानाच मनोज जरांगे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना थेट छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. आज सकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी 4 जून रोजी सुरू होणारे उपोषण कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, असे सुरुवातीलाच स्पष्ट केले. कितीही एसआयटी लावा, गुन्हे दाखल करा, मी मागे हटणार नाही, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे
मराठा समाजाने ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली आहे. आमची कोणतीही मागणी नसताना सरकारने 10 टक्क्यांचे बिनकामाचे आरक्षण दिले. ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयर्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी सरकारने केली नाही तर मराठा समाज विधानसभेची निवडणूक पूर्ण क्षमतेने लढवेल, या भूमिकेचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
मी जातीयवाद केलेला नाही
मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होईल असे कोणतेही विधान मी केलेले नाही. उलट या दोन समाजातील सलोखा कायम राहावा अशीच माझी भूमिका राहिली आहे. परंतु ओबीसींचे नेते मात्र मला जातीयवादी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना नामोल्लेख न करता लगावला. मतदान होईपर्यंत मी जातीयवादी नव्हतो, मतदान झाले की मी लगेच जातीयवादी झालो, हा चमत्कारच म्हणायला हवा, असेही ते म्हणाले.