औरंगजेबाची कबर काढायची असती तर मुख्यमंत्र्यांनी संरक्षण दिलं नसतं

‘मुख्यमंत्र्यांना औरंगजेबाची कबर काढायचीच नाही. त्यांनीच कबर फोकसला आणली नसती. ते डबडं कुठं पुरून ठेवलंय हे कुणालाच माहिती नव्हतं. त्यांनी उलट माहिती करून दिली. औरंगजेबला फोकसमध्ये आणलं. फडणवीस हा कावेबाज माणूस आहे. त्यांना कबर काढायचीच नाही. काढायची असती तर त्यांनी पोलीस संरक्षण नसतं लावलं. राजकारण नाही; पण त्यांना फायद्यासाठी लढायचं आहे’, असे मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आयोजित बैठकीनंतर म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा फरार कोरटकर फडणवीस सरकारचा सोयरा आहे. त्यामुळं तो सापडत नाही. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून मकोका अंतर्गत कारवाई केली पाहिजे. काही जण राजरोसपणे शिवराय आणि जिजाऊंबद्दल अपमानास्पद वक्तव्य करत आहेत. यांनी फक्त मराठा समाजाचा भांडणासाठी वापर केला आहे. तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही आणि ते आम्हाला नकोही. अपमान करणारे सगळे फडणवीसांचे सोयरे आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.