आंतरवाली लाठीहल्ल्याला चार महिने पूर्ण – सरकारचे तोंडही पाहावे वाटत नाही! मनोज जरांगे यांचा मिंध्यांवर निशाणा

‘शांततेत आंदोलन करणाऱया निष्पाप कार्यकर्त्यांवर अचानक लाठय़ा चालवण्यात आल्या. लाठय़ांपाठोपाठ गोळय़ांचा वर्षाव झाला. अश्रुधुराचे लोट उठले. भजनाचा आवाज किंकाळय़ांमध्ये बदलला. माथी फुटली, रक्त सांडले. लहान मुलांच्या आक्रोशाने काळीज गोठून गेले… नुसती आठवण झाली तरी चीड येऊन सरकारचे तोंडही पाहावे वाटत नाही. असे निर्दयी सरकार कधीही येऊ नये!’ असा हल्लाबोल मनोज जरांगे यांनी केला.

आंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याला आज चार महिने पूर्ण झाले. सरकारने शब्द देऊनही मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे अद्यापही मागे घेण्यात आले नाहीत. पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांनी यावरून राज्य सरकारवर चांगलीच आगपाखड केली. लाठीहल्ल्याचा तो प्रसंग आठवला तरी मन सुन्न होते. हा अत्याचार मराठा समाज कधीही विसरणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.

सोयरपण जिथे होते ते सोयरे

सोयरे या शब्दावरून सरकारने खेळ केला. सोयरे म्हणजे सोयरपण जिथे होते ते सोयरे, अशी व्याख्या सांगतानाच तिथे आईचा आणि आईच्या जातीचा संबंध येतो कुठे, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. सोयरे हा शब्द सरकारच्याच मंत्र्यांनी-कायदेतज्ञांनी लिहून घेतला आहे. सरकारने दिलेला शब्द पाळावा, तसा कायदा करावा. तरच मराठा समाज विचार करेल, अन्यथा आमचे मुंबईतील उपोषण होणारच, असेही त्यांनी बजावले.