गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही! मनोज जरांगे यांचा निर्धार

‘आमचा निर्णय झाला आहे, मराठा समाजाचे आंदोलन होणारच! गोळ्या घातल्या तरी आता मागे हटणार नाही,’ असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. सरकारमधील काही मंत्र्यांनी या आंदोलनाविरोधात षड्यंत्र रचले असून आमच्यावर ट्रॅप लावला जातोय, एवढेच नाहीतर आमची माणसेही फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा स्पष्ट आरोपही त्यांनी केला. मराठा समाजाचा अपमान करणार्‍या मंत्र्यांची नावेही आपण जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले.

आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्र आणि राज्यातील सरकारांना मराठ्यांकडून सत्ता पाहिजे. पण, मराठे नकोत, मुंबईत होणारे आंदोलन रोखण्यासाठी रात्री उशिरापर्यंत बैठका घेतल्या जात आहेत. मराठ्यांना जेरीस आणण्यासाठीच हा सगळा खटाटोप करण्यात येत आहे. सरकारमधील काही मंत्री हा उपद्व्याप करत असून आंदोलन फोडण्याचाही कट रचण्यात आल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

मुंबईत होणारे आंदोलन दडपण्यासाठी गुजरातसह इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणावर कुमक मागविण्यात आल्याची माहिती आहे. त्याबाबत आमचे काही म्हणणे नाही. पण, सरकारने कितीही षड्यंत्र रचले, कितीही अडथळे आणले तरी आता हे आंदोलन थांबणार नाही. सरकारसमोर पर्याय एकच आहे आणि तो म्हणजे सरसकट आरक्षण देणे. आता गोळ्या घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही, असा निर्धारही जरांगे यांनी बोलून दाखविला.

किती लोकप्रतिनिधी सामील होतात बघू
आम्ही 20 जानेवारीला मुंबईकडे कूच करणार आहोत. अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी कोण बोलले, याचा लेखाजोखा आमच्याकडे आहे. आता या आंदोलनात किती लोकप्रतिनिधी सामील होतात तेच बघायचे आहे, असे मनोज जरांगे म्हणाले. आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले.

सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा आंतरवालीत
मुंबईकडे कूच करण्याचा मुहुर्त जसजसा जवळ येत आहे तसे राज्य सरकारचे लटपटणे सुरू झाले आहे. आमदार बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मंगेश चिवटे, जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, अपर जिल्हाधिकारी रिता मेहेत्रेवार, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोमाणे हे आज सुधारित मसुदा घेऊन आंतरवालीत दाखल झाले. सगेसोयर्‍यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल असे त्यात म्हटले आहे. पण ५४ लाख नोंदी सापडूनही प्रमाणपत्र देण्यात येत नाही. दोन दिवसांत प्रमाणपत्र वाटप करा तरच सरकारवर विश्वास ठेवता येईल. नाहीतर पुन्हा फसवणूक केल्यासारखे होईल असे ठणकावून सांगतानाच त्यांनी मुंबईतील आंदोलनावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.