मला तुरुंगात डांबून मारण्याचा देवेंद्र फडणवीसांचा डाव आहे. त्यामुळे पुढची धुरा मराठा समाजाने आपल्या खांद्यावर घ्यावी. आगामी विधानसभेत भाजपचे सगळे उमेदवार पाडण्यासाठी मराठा समाजाने कंबर कसून काम करावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. दरम्यान, प्रकृती खालावल्याने जरांगे यांनी आपले उपोषण स्थगित केले असून त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पाचव्यांदा बेमुदत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची प्रकृती कालपासून खालावली होती. आज सकाळी वैद्यकीय पथकाने तपासणी केल्यानंतर त्यांना उपचार घेण्याची विनंती केली. मराठा समाज तसेच आंतरवाली सराटीतील ग्रामस्थांनी विनंती केल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराजांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण सोडले. त्यानंतर उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी भाजप आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली.
सांस्कृतिक मंत्रालयाने मदत करू नये का?
मला अटक करण्यासाठी वॉरंट काढण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाटक आम्ही मराठवाड्यात दाखवले. या कार्यक्रमात तोटा आला. जमा झालेले पैसे आम्ही वाटप केले. हा सांस्कृतिक कार्यक्रम होता. सांस्कृतिक मंत्रालयाने यासाठी मदत का करू नये? छत्रपती शिवाजी महाराज फक्त निवडणुकीपुरतेच वापरायचे का? असा संतप्त सवाल मनोज जरांगे यांनी केला. कोर्टाने हजर राहून रीतसर पैसे भरायला सांगणे अपेक्षित आहे, कोर्ट म्हणजे हुकूमशहा आहे का? आताच का वॉरंट निघाले? असा प्रश्नही त्यांनी केला.
भाजपला मराठे संपवायचे आहेत
भाजपला मराठे संपवायचे आहेत, असा स्पष्ट आरोप मनोज जरांगे यांनी केला. देवेंद्र फडणवीस हा माणूस अतिशय कुटील आहे. मराठा समाजाच्या ओढाताणीमुळे भाजपला सत्ता मिळाली, पण आता यांच्या बुडाखालची खुर्ची खेचलीच पाहिजे. आगामी विधानसभेत भाजपचा एकही उमेदवार निवडून येता कामा नये. प्रसंगी ओबीसी उमेदवार निवडून आणा, पण भाजपची गुर्मी उतरवा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.