आंदोलने होतच असतात, त्याचा फारसा परिणाम होत नाही, या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलेल्या वक्तव्याची मनोज जरांगे पाटील यांनी चिरफाड केली. अमित शहा यांना पटेल, गुर्जर आंदोलन हाताळण्याचा अनुभव असेल; पण मराठ्यांच्या नादी लागू नका. तुमचा राजकीय एन्काऊंटर झाल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा जरांगे यांनी अमित शहा यांना दिला.
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले बेमुदत उपोषण उच्च न्यायालयाच्या सन्मानासाठी स्थगित करून मनोज जरांगे हे उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. पटेल, गुर्जर आंदोलने तुम्ही कशा पद्धतीने हाताळलीत हे आम्ही पाहिले आहे. मराठा आंदोलन हाताळण्याची भाषाही करू नका. ते तुम्हाला परवडणार नाही, असा टोला जरांगे यांनी लगावला. मराठा आंदोलनाला हात लावला तर ती तुमची घोडचूक ठरेल, असेही ते म्हणाले.