बीडीडीच्या धर्तीवर माझगाव बीआयटी चाळींचा पुनर्विकास व्हावा! शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

माझगाव ताडवाडी येथील 100 वर्षांहून जास्त जुन्या बीआयटी चाळींचा पुनर्विकास गेल्या 19 वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे बीडीडी चाळींच्या धर्तीवर राज्य सरकारने पुढाकार घेऊन पालिकेच्या माध्यमातून माझगाव बीआयटी चाळींचा पुनर्विकास करावा, अशी मागणी शिवसेना उपनेते आमदार मनोज जामसुतकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

भायखळा विधानसभा मतदारसंघातील माझगाव ताडवाडी येथे मुंबई महापालिकेच्या मालकीच्या 16 बीआयटी चाळी आहेत तर ए, बी, सी ब्लॉक आहेत. त्यात प्रामुख्याने मराठी कुटुंबे पिढयानपिढया राहतात. या चाळींच्या पुनर्विकासासाठी रहिवाशी-भाडेकरूंनी माझगाव ताडवाडी सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना करून त्या माध्यमातून 2005 साली एका विकासकाची नियुक्ती केली होती. परंतु त्याने 2005 ते 2018 पर्यंत पुर्नविकासाला सुरुवात न केल्यामुळे या विकासकाची नियुक्ती मुंबई महापालिकेने रद्द केली.

विश्वासात न घेता विकासक नेमला

मुंबई महापालिकेने रहिवाशांना विश्वासात न घेता चाळींच्या पुनर्विकासासाठी 2022 साली मे. बाय. एम. अॅण्ड मेकवाईज एल एल पी कंपनीची विकासक म्हणून नेमणूक केली. मात्र, या विकासकाने तो रहिवाशांना किती चौरस फुटाचे घर देणार, कोणत्या सुविधा देणार, भाडे किती देणार हे स्पष्ट केलेले नाही. थोडक्यात विकासकाने पुनर्विकासाबाबत कोणत्याही पद्धतीची पारदर्शकता ठेवलेली नाही.

पुनर्विकासाबाबत संयुक्त बैठक घ्या!

मुख्यमंत्र्यांच्या दालनात नगरविकास विभाग दोनचे मुख्य सचिव, उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष/पदाधिकारी, महापालिका आयुक्त, महापालिकेच्या संबधित विभागाचे अधिकारी व रहिवाशी/भाडेकरू यांचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करून पुनर्विकासाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी मनोज जामसुतकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

’त्या’ 220 कुटुंबांना पुन्हा माझगावमध्ये आणा

बीआयटी चाळ क्रमांक 12 ते 16 या इमारतीची अवस्था राहण्यास अत्यंत धोकादायक झाल्यामुळे मुंबई महापालिकेने 220 कुटुंबीयांना बळजबरीने प्रदूषित अशा माहुलमधील संक्रमण शिबिरात स्थलांतरीत केले. या 220 कुटुंबीयांना पुन्हा माझगावमध्ये स्थलांतरित करावे तसेच 180 कुटुंबीयांसाठी प्रत्यक्ष जागेवर माझगाव ताडवाडी येथेच संक्रमण शिबीर उभारले आहे. यालाही आता 15 वर्षे झाली असून या संक्रमण शिबिराची अवस्थादेखील दयनीय झालेली आहे. त्यामुळे लवकर लवकर या चाळींचा पुनर्विकास करावा, अशी मागणी जामसुतकर यांनी केली आहे.