राजकारण सोडेन, पण उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणार नाही

उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे भाजप आणि मिंधे गटाकडून माझ्या बदनामीचा घाट घातला आहे. मी मिंधे गटाच्या संपर्कात आहे अशा वावड्या उठवल्या जात आहे. एका वृत्तवाहिनीवर दाखवण्यात आलेला व्हिडीओ हा 2022 पूर्वीचा असून गद्दारांचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर मी कधीच मंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यावर गेलो नाही. वेळ आली तर राजकारण सोडेन, पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणार नाही, असे माजी आमदार मनोहर भोईर यांनी मिंधे गट आणि भाजपला ठणकावले आहे.

उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मनोहर भोईर हे मिंधे गटाच्या संपर्कात असून त्यांची नुकतीच मंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यावर बैठक झाली आहे, असे दिशाभूल करणारे वृत्त एका वृत्तवाहिनीवर प्रसारित झाले होते. या वृत्तामध्ये भोईर आणि भुसे हे चर्चा करीत असल्याचा व्हिडीओही दाखवण्यात आला होता. या खोट्या वृत्ताचा मनोहर भोईर यांनी पर्दाफाश केला आहे. उरण विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचा जनाधार मोठा असून विद्यमान खोके सरकारच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्याचा जोरदार फटका यावेळी भाजपच्या विद्यमान आमदारांना बसणार आहे. या परिस्थितीचा त्यांनी धसका घेऊन माझी बदनामी सुरू केली आहे. मात्र मी निष्ठावंत शिवसैनिक आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक पदांवर काम करण्याची संधी मला दिलेली आहे. त्यांचा विश्वासघात माझ्याकडून कधीच होणार नाही. वेळ आली तर मी राजकारण सोडेन, पण शिवसेना पक्षप्रमुखांशी कधीच गद्दारी करणार नाही. भाजप आणि मिंधे गट यांनी अशा कितीही वावड्या उठवल्या तरी त्याचा कोणताही परिणाम शिवसेनेच्या जनाधारावर होणार नाही. आगामी निवडणुकीत या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवाच फडकणार आहे, असा विश्वासही मनोहर भोईर यांनी व्यक्त केला आहे.