परळमध्ये रंगणार बहुप्रतीक्षित माण देशी महोत्सव 2025, महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन

बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित माण देशी फाऊंडेशन आयोजित अस्सल मराठमोळ्या मातीचा ‘माण देशी महोत्सव 2025’ यंदा 5 फेब्रुवारी पासून परळच्या नरे पार्कमध्ये रंगणार आहे. 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी असे पाच दिवस रंगणाऱ्या या महोत्सवात कुस्ती, बॉक्सिंग, अवधूत गुप्ते यांच्या रांगड्या आवाजात संगीत, महिलांसाठी मंगळागौर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाची सुरुवात 5 फेब्रुवारीला होणार आहे. 5 ते 9 फेब्रुवारी दरम्यान दररोज सकाळी 10.30 ते रात्री 9.30 पर्यंत विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 5 फेब्रुवारीला मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडेल. उद्घाटन सोहळा गजी नृत्याने सुरू होईल. याच सोहळ्यात माणदेशी महिलांनी 10 लाख महिला सक्षमीकरणाचा मैलाचा टप्पा गाठल्याचे घोषित करण्यात येईल. तसेच मंगळागौर कार्यक्रम सादर केला जाईल. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मुलींची माणदेशी कुस्ती आणि बॉक्सिंग अजिंक्य स्पर्धा पार पडेल. तिसऱ्या दिवशी सायंकाळी 5.30 वाजता माणदेशी शेतकरी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच संध्याकाळी 7 पासून प्रसिद्ध गायक व संगीतकरा अवधूत गुप्ते आपल्या आवाजने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतील. तसेच या कार्यक्रमाला प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकही उपस्थित असणार आहेत. कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी सायंकाळी 7 पासून अभंग सादरीकरण आणि रविवारी सायंकाळी 5 पासून समारोप सोहळ्याला सुरुवात होईल.

माण देशी महोत्सव 2025 ची वैशिष्ट्ये:

  1. रुचकर भोजन दालन : महोत्सवाचे एक आकर्षक वैशिष्ट्य म्हणून, रुचकर भोजन दालन असतील, जिथे पाहुणे ग्रामीण महाराष्ट्राच्या पारंपारिक आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आनंद घेऊ शकतात. गावरान मटण आणि भाकरी, थालिपीठ, कोल्हापूरी मिसळ, मासवडी, आणि सिल्वासा येथील दांगी पदार्थ यांसारख्या पदार्थांची चव घेतली जाऊ शकते.
  2. हस्तकला प्रदर्शन व विक्री : महोत्सवात अप्रतिम ग्रामीण कलेचे प्रदर्शन पाहता येईल. जेन आणि घोंघडी (पारंपारिक दागिने बनवणे), कोल्हापूरी चपला तयार करणे. सर्व वयोगटाच्या व्यक्तींना, विशेषत: मुलांना मातीचे मडके बनविण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल.
  3. कला कार्यशाळा: महोत्सवात हस्तकला कार्यशाळा भरवण्यात येईल. जिथे पाहुणे माण देशी महिलांकडून पारंपारिक कलेची प्रशिक्षण घेऊ शकतात. या कार्यशाळांमध्ये वारली पेंटिंग आणि लाइव्ह दागिने बनवण्याच्या सत्रांचा समावेश असेल.
  4. सांस्कृतिक कार्यक्रम: ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा उत्सव साजरा करण्यासाठी महोत्सवात गज्जी नृत्य आणि कुस्तीचे यांचा समावेश असेल. त्याशिवाय, प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते हे आपल्या संगीताने महोत्सवात रंग भरतील.
  5. शेतकर्‍यांच्या उत्पादनांचा बाजार: महोत्सवात माण देशीच्या शेतकर्‍यांकडून थेट विक्रीसाठी ताजे उत्पादन विकले जाईल. तूप, मध, गूळ, डाळिंब, आणि स्ट्रॉबेरी अशी नैसर्गिक आणि सेंद्रिय उत्पादने पाहुण्यांना खरेदी करता येतील.
  6. ग्रामीण संस्कृतीचा अनुभव: महोत्सवात ग्रामीण जीवनशैलीचा परस्पर अनुभव घेता येईल. यामध्ये नंदी बैल, पिंगला नृत्य, यांचा समावेश असेल, ग्रामीण जीवनशैली आणि परंपरेची उत्कृष्ट छायाचित्रे घेण्यासाठी विशेष सेल्फी पॉइंट्स सज्ज असतील.
  7. महिला उद्योजकांचा सन्मान: माण देशी महोत्सव 2025 मध्ये माण देशी फाऊंडेशनच्या उपक्रमांच्या माध्यमातून सक्षम झालेल्या 10 लाख महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात गौरविण्यात येईल.

या महोत्सवाचे उदघाटन बुधवार, 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आणि एच.टी.पारेख फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झिया ललकाका, एचएसबीसीच्या `परोपकार व शाश्वतता’ विभागाचे जागतिक प्रमुख अलोका मजुमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.