Lok Sabha Election : मोदींची भाषा घृणास्पद, असंसदीय अन् खालच्या थराची; मनमोहन सिंग यांचा सणसणीत टोला

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचे मतदान 1 जूनला म्हणजे येत्या शनिवारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांनी मतदारांना खास आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी पंजबाच्या जनतेला पत्र लिहिले आहे. पंतप्रधान मोदींची भाषा आणि त्यांच्या धोरणांवरून डॉ. मनमोहन सिंग यांनी पत्रातून हल्लाबोल केला आहे.

देश एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. अखेरच्या टप्प्याच्या मतदानात आपल्याला लोकशाही आणि संविधान सुरक्षित ठेवण्याचा आणि एक निरंकुश राजवट संपवण्याची शेवटची संधी आहे. पंजाब आणि पंजाबी योद्धा आहेत. बलिदानाच्या भावनेसाठी आपण ओळखले जातो. आपला सद्भाव, सौहार्द आणि लोकशाही व्यवस्थेवरील दृढ विश्वास हा या महान देशाची सुरक्षा करू शकतो, असे मनमोहन सिंग पत्रात म्हणाले.

‘पंतप्रधानांची भाषा असंसदीय’

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारत राजकीय घडामोडींकडे माझं बारीक लक्ष आहे. मोदींनी अतिशय घृणास्पद भाषणं केली आहेत. ही भाषणं समाजात फूट पाडणारी आहेत. मोदी पहिले असे पंतप्रधान आहेत ज्यांनी पदाची गरीमा आणि पंतप्रधानपदाचे गांभीर्य कमी केले आहे. यापूर्वी कुठल्याही पंतप्रधानांनी एखाद्या विशेष वर्गाशी संबंधित किंवा विरोधी पक्षांबाबत इतक्या घृणास्पद, असंसदीय आणि खालच्या पातळीच्या भाषेचा वापर केला नाही. माझ्या संबंधातही त्यांनी काही वक्तव्ये केली आहेत. मी माझ्या जीवनात कधीही एका समाजाला दुसऱ्या समाजापासून वेगळे केले नाही. ही भाजपची सवय आणि विशेष अधिकार आहे, असा सणसणीत टोला मनमोहन सिंग यांनी पत्रातून लगावला.

‘भाजपने केली पंजाबची बदनामी’

गेल्या दहा वर्षांत भाजप सरकारने पंजाब आणि पंजाबींना बदनाम करण्यात कुठलीही कसर सोडली नाही. पंजाबमधील 750 शेतकरी शहीद झाले. शेतकरी अनेक महिने दिल्लीच्या सीमेवर वाट पाहत बसले होते. पण या सरकारने त्यांच्या त्यांच्यावर हल्ले घडवून आणले. शेतकऱ्यांना संसदेत आंदोलनजीवी आणि परजीवी म्हटले गेले, अशी टीका मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदींवर केली.

शेतकऱ्यांचे मुद्दे मांडले

मोदींनी 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. पण त्या उलट 10 वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले. शेती आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबाची बचत नष्ट केली आणि त्यांना वाऱ्यावर सोडले. यावेळी काँग्रेसने जाहीरनाम्यात ‘किसान न्याय’ अंतर्गत 5 गॅरंटी दिल्या आहेत. एमएसपी कायदा आणण्याची गॅरंटी, कृषी क्षेत्रासाठी स्थिर आयात-निर्यात धोरण, कर्जमाफी आणि इतर घोषणा काँग्रेसने केल्याचे मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

नोटीबंदीचा निर्णय चुकीचा

मनमोहन सिंग यांनी आपल्या पत्रातून मोदी सरकारच्या धोरणांची खरडपट्टी काढली आहे. गेल्या 10 वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेत अकल्पनीय उलथा-पालथ झाली आहे. नोटबंदी, चुकीच्या पद्धतीने जीएसटी लागू करणे, करोना काळात लॉकडाउनच्या निर्णयाने विदारक स्थिती निर्माण केली आहे. भाजप सरकारच्या कार्यकाळात आर्थिक विकास दर 6 टक्क्यांहूनही कमी राहिला. तर काँग्रेस-यूपीएच्या कार्यकाळात विकास दर हा जवळपास 8 टक्क्यांवर होता, असे म्हणत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली.