मोदींची भाषा द्वेषाची! पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा घालवली; मनमोहन सिंग यांचे प्रत्युत्तर

माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांनी शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी विशेष आवाहन करणारे पत्र लिहिले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान मोदींनी द्वेषाची भाषा वापरली. त्यांची भाषणे पूर्णपणे फूट पाडणारी आहेत. या भाषणांद्वारे त्यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा घालवली. याआधी कोणत्याही पंतप्रधानाने माझ्याविरुद्ध अशी घृणास्पद, असंसदीय आणि खालची भाषा वापरली नाही, अशा शब्दांत मनमोहन सिंग यांनी मोदींना पत्राद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. माझ्या आयुष्यात मी असं केलं नाही… हे वाक्य भाजपचे कॉपीराईट वाक्य झाले आहे, असा जोरदार टोलाही त्यांनी मोदींच्या वारंवार खोटे बोलण्यावर लगावला.

देशातील संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे, असे मनमोहन सिंग यांनी म्हटल्याचा आरोप मोदी यांनी केला होता, त्याला मनमोहन सिंग यांनी पत्राद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने पंजाब, पंजाबी आणि पंजाबियतला बदनाम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. पंजाबमधील शेतकरी अनेक महिने दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाला बसले, तब्बल 750 शेतकरी शहीद झाले. मात्र सरकारने काय केले… तर त्यांच्यावर हल्ला केला. संसदेत शेतकऱयांना आंदोलनजीवी आणि परजीवी म्हटले. मोदींनी 2022पर्यंत शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते, उलट 10 वर्षांत शेतकऱयांचे उत्पन्न घटले, याची आठवणही मनमोहन सिंग यांनी मोदींना पत्रातून करून दिली आहे.

अग्निवीर योजनेवरूनही मनमोहन सिंग यांनी टीका केली आहे. देशभक्ती, शौर्य आणि सेवेचे मूल्य केवळ चार वर्षांचे आहे, असे भाजपला वाटतेय. यातून भाजपचा नकली राष्ट्रवाद दिसून येत आहे, अशा शब्दांत मनमोहन सिंग यांनी भाजपला धारेवर धरले.

सरकारचे अनेक निर्णय चुकले
मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारचे अनेक निर्णय चुकल्याचे म्हटले आहे. नोटाबंदी, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी, कोरोना लॉकडाऊनचा निर्णय यांमुळे अत्यंत दयनीय परिस्थिती निर्माण झाली. मोदी सरकारच्या कार्यकाळात जीडीपीच्या सरासरी वाढीचा दर 6 टक्क्यांहून घसरला, तर काँग्रेस-यूपीएच्या कार्यकाळात तो 8 टक्क्यांच्या आसपास होता, अशा शब्दांत मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला आरसा दाखवला आहे.

10 वर्षांत भाजपने पंजाबला सातत्याने दुखावले – राहुल गांधी
गेल्या 10 वर्षांत नरेंद्र मोदी आणि भाजपाने पंजाब, पंजाबी आणि पंजाबियतला सातत्याने दुखावले. काँग्रेसची गॅरंटी पंजाबसह संपूर्ण देशाला दिलेल्या जखमांवर मलम लावण्याचे काम करेल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सवरून म्हटले आहे. तसेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंजाबमधील जनतेला भावुक अपील असे म्हणत राहुल गांधी यांनी एक्सवरून त्यांचे पत्र शेअर केले आहे.