डॉ. मनमोहन सिंग राज्यसभेतून निवृत्त; मल्लिकार्जुन खरगे यांचे भावूक पत्र

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आज राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या निवृत्तीवर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भावूक पत्र लिहून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Mallikarjun Kharge यांनी मनमोहन सिंग यांच्यासाठी खास पत्र लिहिले आहे. ‘मनमोहन सिंग यांनी समर्पणाने देशाची सेवा केली आहे. तुम्ही कायम देश आणि काँग्रेससाठी काम केले आहे. काही मोजक्या लोकांपैकी तुम्ही एक आहात. आता तुम्ही सक्रिय राजकारणात नसाल. मात्र जनतेसाठी तुमचा आवाज कायम उठेल. तीन दशकांहून अधिक काळ तुम्ही सेवा केली आहे. तुमच्या निवृत्तीमुळे एका युगाचा अंत झाला आहे.’ ‘देश आज जी आर्थिक समृद्धी आणि स्थैर्य अनुभवत आहे, ते दिवंगत पंतप्रधान नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी रचलेल्या पायावर आधारित आहे’, असे खरगे म्हणाले.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा आज राज्यसभेतील 33 वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. 1991 साली ते पहिल्यांदा राज्यसभेचे सदस्य बनले. 1991 ते 1996 पर्यंत नरसिंह राव अर्थमंत्री होते. आपल्या कार्यकाळादरम्यान त्यांनी देशाच्या अर्थव्यस्थेला बळकटी आणली. बरोबरच मनमोहन सिंह 2004 ते 2014 पर्यंत देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. मनमोहन सिंह आणि सात केंद्रीय मंत्र्यांसह 49 सदस्यांचा कार्यकाळ समाप्त झाला. तर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी पहिल्यांदाच संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत प्रवेश करणार आहेत.