
डोंबिवली-माणकोली पुलाच्या सुरुवातीचा रस्ता आठ ते दहा इंचाने खचल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. एमएमआरडीएच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची तक्रार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी करताच प्रशासन खडबडून जागे झाले. आता खचलेल्या रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले आहे.
उल्हास खाडीवरील डोंबिवली-माणकोली पूल हा वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा समजला जातो. या पुलाचे लोकार्पण झाले नसले तरी गेल्या वर्षभरापासून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र अल्पावधीतच या पुलाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर रस्ता खचल्याचे दिसून आले. भिवंडीहून डोंबिवलीकडे येताना सुमारे पंधरा फूट रस्त्याचा भाग खचला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी खचलेल्या रस्त्याचे फोटो आणि निवेदन एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिले. या निकृष्ट कामासाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
सावित्रीसारखी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
माणकोली पुलाचा रस्ता खचणे ही अत्यंत गंभीर बाब असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात महाडमधील सावित्री नदीवरील पुलासारखी गंभीर दुर्घटना घडली तर त्यास जबाबदार कोण, असा सवाल विभागप्रमुख व ठाणे ग्रामीणचे कक्ष जिल्हा प्रसारक प्रमोद कांबळे यांनी केला आहे.