राहुल कर्डिले यांच्या नाशिक महापालिका आयुक्तपदावरील नियुक्तीला अवघ्या दोनच दिवसात ब्रेक देवून त्यांच्याजागी नाशिक महानगर विकास प्राधिकरणाच्या आयुक्त मनिषा खत्री यांची वर्णी लावण्यात आली. मर्जीतल्या अधिकाऱ्यांऐवजी कर्डिले यांना आयुक्तपदी बसवल्याने नाराज झालेल्या गिरीश महाजन यांच्यासाठीच हा बदल करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.
वादग्रस्त भूसंपादनासह भ्रष्ट कारभारामुळे तक्रारी झाल्यानंतर आयुक्त डॉ. अशोक करंजकर हे वैद्यकीय रजेवर होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नियुक्ती केली. त्यापूर्वीच मंत्री महाजन यांच्या प्रयत्नाने मनिषा खत्री यांना प्रभारी आयुक्त करण्यात आले होते. मात्र, कर्डिले यांच्या नियुक्तीमुळे त्यांनी प्रभारी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला नव्हता. अवघ्या दोनच दिवसात राहुल कर्डिले यांची बदली करुन खत्री यांची नियुक्ती करण्यात आली.