इंफाळ येथे आज संशयित बंडखोरांनी केलेल्या गोळीबारात एका महिलेसह दोन ठार झाले तर या महिलेची मुलगी आणि पोलिस अधिकारी एन. रॉबर्ट यांच्यासह 9 जण गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे मणिपूरमधील हिंसाचार थांबत नसल्याचेच पुन्हा सिद्ध झाले आहे.
गेल्या दीड वर्षांपासून मणिपूर जळते आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये आजतागायत पाय ठेवलेला नसून येथील हिंसाचार थांबवण्यात एनडीए सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, अशी टीका विरोधकांकडून होते आहे.
कांगपोकपीमधील नखुजांग गावातून दुपारी 2 वाजून 35 मिनीटांनी इंफाळ पश्चिमेकडील कडंगबंदकडे हा गोळीबार झाला. तसेच, या वेळी ड्रोनने टाकलेल्या बॉम्बमुळे दोन पोलिसही जखमी झाले असून दोघांची प्रकृती सुखरूप असल्याचे सांगितले. कांगपोकपी हे कुकी-बहुल क्षेत्र आहे. कुकी दहशतवाद्यांनी महिलेला ठार मारले, असा मैतेई संघटनांचा आरोप आहे. तर, मैतेईंनी कुकी गावांमध्ये प्रथम गोळीबार सुरू केला असा आरोप कुकी जमातीतील सोशल मीडिया वापरकर्त्यांनी केला आहे. संशयित बंडखोरांनी डोंगराळ भागातून कोत्रुक आणि कडंगबंद येथील पर्वतीय रांगांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार सुरु केला. या बंडखोरांनी बॉम्बफेकही केली. या बॉम्ब स्पह्टांतील छर्रे लोकांना लागले. गोळीबारामुळे अनेक घरांचेही नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.