मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या विरोधात मंगळवारी राज भवनावर मोर्चा नेण्याच्या प्रयत्नात सुरक्षा दळांशी झालेल्या झटापटीत 40 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. आंदोलकांच्या जमावातून सुरक्षा दलावर बेचकीने छर्र्यांचा मारा करण्यात आल्याचे समजते. विद्यार्थ्यांच्या या उग्र आंदोलनानंतर मणिपूर सरकारने इम्फाळ पूर्व आणि पश्चिम जिह्यांत संचारबंदी आणि संपूर्ण राज्यात 5 दिवसांची इंटरनेट बंदी जारी केली आहे.
पोलिस महासंचालक आणि राज्य सरकारचे सुरक्षा सल्लागार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रविवारपासून प्रामुख्याने हजारो मैतेई विद्यार्थी, महिला रस्त्यावर उतरले आहेत. या विद्यार्थी आणि महिला निदर्शकांनी येथील बीटी रोडवरील राजभवनाच्या दिशेने आज जाण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षा दलांनी त्यांना काँग्रेस भवनाजवळ रोखल्यावर आंदोलक अधिक आक्रमक झाले. घोषणाबाजी करणाऱ्या या निदर्शकांनी सुरक्षा कर्मचाऱ्याना दगड आणि काचेच्या गोट्यांचा मारा केला. या जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्याना स्टन ग्रेनेड, अश्रुधुराची नळकांडी पह्डावी लागली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
अमित शहा यांच्या प्रतिकृतीचे दहन
मणिपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीही आज निषेध रॅली काढून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिकृतीचे दहन केले. नंतर राजभवन व राज्य सचिवालयाकडे निघालेल्या या आंदोलकांना इंफाळ पश्चिम जिह्यातील काकवा येथे रोखण्यात आले. या वेळी उडालेल्या चकमकीमध्ये 40 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
सीआरपीएफ कुमक वाढवली
वांशिक हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये सुरक्षा व्यवस्थेसाठी केंद्राने सीआरपीएफच्या सुमारे दोन हजार जवानांचा समावेश असलेल्या आणखी दोन बटालियन तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत. यापैकी तेलंगणातील वारंगल येथून येणारी बटालियन 58 चे मुख्यालय चुराचंदपूर जिह्यातील कांगवाई येथे तर, झारखंडच्या लाटेहर येथून येणारी बटालियन 112 चे मुख्यालय इम्फाळच्या परिसरात असेल. आसाम रायफल्सच्या दोन बटालियन जम्मू-कश्मीरला पाठवल्यामुळे येथे येणाऱ्या या बटालियनच्या तुकडय़ा राज्यात विविध भागात तैनात करण्यात येतील.
हल्ल्यांसाठी अत्याधुनिक रॉकेट्सचा वापर
राज्यात काही ठिकाणी झालेल्या ड्रोन आणि हायेटक क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अत्याधुनिक रॉकेट्सच्या टोकाकडील भागाचे तुकडे सापडले आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. नागरी भागावरील हल्ल्यांसाठी वापरलेले ड्रोनही मिळाले आहेत, असे पोलिस महानिरीक्षक के जयंत सिंह यांनी सांगितले. मणिपूर पोलिस हे मैतेईधार्जीणे पोलीस असल्याचा आरोपही पोलीस अधिकाऱ्यानी फेटाळला आहे.
इंटरनेट बंदी आणि संचारबंदी
इंटरनेटद्वारे सोशल मीडियाचा समाजपंटक छायाचित्रे, द्वेषयुक्त भाषण आणि द्वेषपूर्ण व्हिडिओ प्रसारित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर करू शकतात अशी शक्यता असल्यामुळे सर्व राज्यात इंटरनेट बंदी अमलात येत असल्याचे गृह विभागाच्या आदेशात म्हटले आहे. इंटरनेट बंदीबरोबरच इम्फाळ पूर्व आणि इंफाळ पश्चिम या दोन्ही जिल्हा प्रशासनाने कर्फ्यू आदेशही आज जारी केले. थौबलमध्ये प्रतिबंधक आदेश लागू करण्यात आले आहेत.