मणिपुरमधील परिस्थिती अस्वस्थ करणारी… राहुल गांधींनी एक्सवर पोस्ट करत मोदींना केले आवाहन

मणिपुरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला असून सहा लोकांच्या हत्येच्या निषेधार्थ संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मणिपुरमधील परिस्थिती अस्वस्थ करणारी असून पंतप्रधानांनी मणिपुरला भेट देऊन प्रदेशात शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मीडीया अकाऊंट एक्सवरुन केलेल्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, मणिपूरमध्ये नुकत्याच झालेला हिंसाचार आणि सततचा रक्तपात अत्यंत अस्वस्थ करणारा आहे. एक वर्षाहून अधिक काळ फाळणी आणि त्रासानंतर केंद्र आणि राज्य सरकार सलोख्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील आणि तोडगा काढतील अशी आशा हिंदुस्थानियांना होती.

राहुल गांधी यांनी पुढे लिहीले की, “मी पुन्हा एकदा पंतप्रधानांना मणिपूरला भेट देऊन प्रदेशात शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यासाठी काम करण्याची विनंती करतो.” असे आवाहन केले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समुदायांमधील हिंसाचारात 200 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.