मणिपूरमध्ये दहशतवाद्यांनी जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणारे ट्रक पेटवले, जिरीबाम आणि चुराचंदपूर जिह्यातील कारवाईत मोठा शस्त्रास्त्र साठा जप्त

सुरक्षा दलांनी तब्बल 11 कुकी दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर आता दहशतवाद्यांनी अनेक ठिकाणी हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. आसाममधील सिलचर शहरातून जिरीबाममार्गे इंफाळला जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणारे दोन ट्रक दहशतवाद्यांनी पेटवून दिले. ही घटना जिरीबामपासून 30 किलोमीटर अंतरावर घडली. त्याचबरोबर सीआरपीएफच्या एका वाहनावरही अंधाधुंद गोळीबार करून नुकसान केले. कुकी दहशतवाद्यांचे हल्ले वाढल्यामुळे आणि अनेक भागात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाल्याने सुरक्षा दलांनी विविध ठिकाणी छापेमारी करत कारवाई सुरू केली. या कारवाईत मोठय़ा प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

मणिपूरमध्ये सातत्याने होत असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पेंद्र सरकारने 2 हजार अतिरिक्त पेंद्रीय सुरक्षा दल मणिपूरला पाठवले आहेत. 20 नवीन तुकडय़ा तैनात केल्यानंतर मणिपूरमध्ये आता शीघ्र कृती दलासह पेंद्रीय सुरक्षा दलांच्या 218 तुकडय़ा असतील. यात इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांचाही समावेश आहे. दुसरीकडे जिरीबामच्या मदत छावण्यांमधून बेपत्ता झालेल्या 6 जणांचा सुगावा न लागल्याने मैतेईंमध्ये प्रचंड नाराजी आहे. जिरीबामध्ये संचारबंदी कायम असून 13 मैतेई संघटनांनी बंदची हाक दिली आहे.

बनावट चकमकीचा कुकींचा आरोप

सुरक्षा दलांनी 11 कुकी दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर जिरीबाममध्ये परिस्थिती तणावाखाली आहे. कुकी संघटनांनी ही बनावट चकमक असल्याचा दावा केला असून तपासाची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आता मणिपूर पोलिसांनी लेखी निवेदनाद्वारे कुकाRच्या आरोपाला उत्तर दिले आहे. सशस्त्र दहशतवाद्यांनी जाकुरधोर येथील सीआरपीएफ चौकीवर आरपीजी, स्वयंचलित शस्त्रास्त्रांसह जड शस्त्रांनी हल्ला केला. प्रत्युत्तराखल केलेल्या गोळीबारात दहशतवादी ठार झाले. हा गोळीबार केला नसता तर सुरक्षा दलांचे आणि नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले असते असे मणिपूर पोलिसांनी सांगितले.

2 इंचाचे मोर्टर, 36 जिवंत काडतुसे

सुरक्षा दलांनी जिरीबाम जिह्यातील चंपानगर, नारायणपूर आणि थंगबोईपंजर येथे छापेमारी करून मोठय़ा प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला. यात एक 2 इंचाचे मोर्टर किंवा लहान तोफ आणि 36 जिवंत काडतुसे तसेच पाच रिकामी काडतुसे यांचा समावेश असल्याचे मणिपूर पोलिसांनी सांगितले. त्यापूर्वी चुराचंदपुर जिह्यातील एक कोटलीयान गावातून एक 303 रायफल, एक 9 एमएमचे पिस्टल, पाच एके 46 सेव्हनचे जिवंत राऊंड, दोन 9 एमएमचे जिवंत राऊंड इत्यादी शस्त्रास्त्रांचा साठाही ताब्यात घेण्यात आला

मणिपूरमध्ये पुन्हा आफस्पा कायदा लागू

मणिपूरच्या सहा पोलीस ठाणे परिसरात पेंद्र सरकारने पुन्हा एकदा ‘आफस्पा’ अर्थात आर्म फोर्सेस स्पेशल पावर अॅक्ट लागू केला आहे. हिंसाचाराग्रस्त जिरीबाममध्येही हा कायदा लागू असेल. सातत्याने होत असलेले कुकी दहशतवाद्यांचे हल्ले आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पेंद्रीय गृहमंत्रालयाने मणिपूरमधील अनेक भागात पुन्हा आफस्पा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला. जिरिबाम आणि चुराचंदपूर जिह्यात अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर शस्त्रसाठा सापडल्यानंतर केंद्र सरकारने तत्काळ मणिपूरमध्ये आफस्पा कायदा पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला. या कायद्यामुळे सुरक्षा दलांना मोहिमा राबवणे आणि कुणालाही वॉरंटशिवाय अटक करणे यांचे अधिकार मिळाले आहेत. तसेच सुरक्षा दलांनी कुणाला गोळय़ा घालून ठार मारल्यास त्यांना अटकेपासून आणि खटला भरण्यापासून संरक्षणही मिळणार आहे.