मणिपूरमध्ये वर्षभरापासून हिंसाचार उफाळला आहे. केंद्र आणि राज्य सरकार येथील हिंसाचार थांबवण्यासाठी कठोर पावले उचलत नाही, तसेच येथील हिंसाचाराला परकीय देशांचा हातभार लागतो आहे. मणिपूरच्या हिंसाचारावरून विरोधी पक्षांनी सरकारला घेरले होते. मात्र, सरकारने मणिपूरच्या हिंसाचाराकडे दुर्लक्ष केले. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सरकारचे कान टोचले आहेत. या हिंसाचाराबाबत भागवत यांची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे.
सरकारने मणिपूर प्रश्नाला प्राधान्य द्यावे. तेथील हिंसाचार रोखण्याची गरज आहे. मणिपूर एक वर्षापासून शांततेची वाट पाहत आहे. हिंसाचार थांबवायला हवा आणि या मुद्द्याला प्राधान्य द्यायला हवे, अशा श्ब्दांत मोहन भागवत यांनी सरकारचे कान टोचले. आता संघाकडूनही हा मुद्दा उचलण्यात आल्याने आतातरी सरकार या गंभीर समस्येकडे लक्ष देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मणिपूरमधील जनता वर्षभरापासून हिंसाचारात होरपळत आहे. तेथील जनतेला शांतता हवी आहे. या राज्यात शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न होण्याची गरज आहे. आपण आपले कार्य करावे, मात्र त्याचा अहंकार बाळगू नये, असे करणारेच जनतेचे खरे सेवक आहेत, असेही भागवत यांनी म्हटले आहे. आपल्याला माणसांची प्रवृत्ती बदलायला वेळ लागेल. मात्र, येथे वर्षभरापासून हिंसाचार भडकत असल्याने या समस्येला प्राधान्य देत शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मणिपूरमधील हिंसाचाराबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रथमच वक्तव्य करण्यात आल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.