मणिपूरमध्ये 11 कुकी दहशतवाद्यांचा खात्मा, दोन जवान गंभीर जखमी; जिरीबाम जिह्यात सीआरपीएफची कारवाई

मणिपूरच्या जिरीबाम जिह्यात उडालेल्या चकमकीत  सुरक्षा दलांनी तब्बल 11 कुकी दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबाराला सीआरपीएफच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांच्या गोळीबारात सीआरपीएफचे 2 जवान गंभीर जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सुरक्षा दलाच्या अधिकाऱयांनी सांगितले. दरम्यान, जवळपास तासभर चकमक सुरू होती.

बोरोबेकरा येथील जाकुराडोर करोंग येथील पोलीस ठाण्यावर कुकी दहशतवाद्यांनी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अंधाधुंद गोळीबार केला. त्यानंतर त्यांची सीआरपीएफ जवानांशी चकमक उडाली. जाकुरडोर करोंग मार्पेटपासून जवळपास 100 मीटर अंतरावर दहशतवाद्यांनी अनेक दुकाने जाळली तसेच काही घरांवरही गोळीबार केल्याची माहिती सीआरपीएफच्या अधिकाऱयांनी दिली.

 

पाच नागरिक बेपत्ता

मणिपूर हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या लोकांसाठी पोलीस स्टेशनजवळ मदत शिबीर उभारण्यात आले आहे. तेथील पाच नागरिक बेपत्ता झाल्याही माहिती सीआरपीएफच्या अधिकाऱयांनी दिली. या नागरिकांचे अपहरण करण्यात आले आहे की पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ते बेपत्ता झाले याबाबत अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, असेही अधिकारी म्हणाले. दहशतवाद्यांनी या मदत शिबिराकडे धाव घेऊन तेथील घरांना आगी लावण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी सुरक्षा दलाच्या  जवानांवर गोळीबार केला. दरम्यान, मदत शिबिरात राहाणारे लोक कुकी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते. याआधीही येथे अनेकदा हल्ले झाले आहेत. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दहशतवादी लष्कराच्या गणवेशात होते

दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांसारखा गणवेश परिधान केला होता. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रs आणि दारूगोळा होता. ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह बोरोबेकरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, दहशतवाद्यांनी आज सकाळी इंफाळ पूर्व जिह्यातील डोंगरावरून केलेल्या अंधाधुंद गोळीबारात एक शेतकरी जखमी झाला.

 

मोठय़ा प्रमाणावर दारूगोळा जप्त

मणिपूरच्या डोंगरी आणि खोऱयातील जिह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांत सुरक्षा दलांनी अनेक शस्त्रास्त्रs, दारूगोळा आणि आयईडी जप्त केले आहेत. 9 नोव्हेंबर रोजी आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने चुराचंदपूर जिह्यातील एल खोनोमफाई गावातील जंगलातून एक 303 रायफल, दोन 9 एमएम पिस्तुले, सहा 12 सिंगल बॅरेल रायफल, एक 22 रायफल आणि दारूगोळा जप्त केला.