पोलीस ठाण्यावर हल्ला करण्यासाठी आलेल्या 11 कुकी दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलांची मोठी कारवाई

मणिपूरमधील सुरक्षा दलांनी सोमवारी केलेल्या एका मोठ्या कारवाईत तब्बल 11 सशस्त्र कुकी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जिरीबाम जिल्ह्यातील बोरोबेकरा येथे पोलीस ठाण्यावर हल्ला करण्यासाठी ते आले होते. सोमवारी दुपारी साडेतीन वाजता कुकी दहशतवाद्यांनी जिरीबाममधील बोरोबेकरा येथील सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केला. यावेळी झालेल्या चकमकीत किमान 11 कुकी अतिरेकी मारले गेले.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात मारल्या गेलेल्या कुकी दहशतवाद्यांकडून 4 एसएलआर , 3 एके-47, एक आरपीजी आणि इतर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी झालेल्या या हल्ल्यात कुकी-हमार समुदायातील सशस्त्र दहशतवाद्यांनी काही घरांना आग लावली. तसेच जिरीबाम जिल्ह्यातील बोरोबेकरा पोलिस स्टेशनवर हल्ला करून अनेक राउंड गोळीबार केला. दरम्यान या चकमकीच 11 दहशतवादी ठार करण्यात सुरक्षा दलाला मोठे यश आले आहे.

जिरीबाममधील बोरोबारका पोलीस ठाण्याला अलीकडच्या काही महिन्यांत अनेकदा लक्ष्य करण्यात आले आहे. याआधी काल, कुकी अतिरेक्यांनी इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील मैतेई समाजाच्या असलेल्या सनसाबी या गावावर हल्ला केला होता.