
अपहरण, हत्या, जाळपोळ, बलात्कार अशा भयंकर घटनांमुळे मणिपूर अक्षरशः होरपळून निघाले. गेल्या 22 महिन्यांपासून रस्ते रक्तपाताने माखल्यानंतर आणि अडीचशे निष्पापांचा बळी गेल्यानंतर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. मात्र आता अमली पदार्थांची तस्करी, अवैध स्थलांतर आणि मोठय़ा प्रमाणावर जंगलतोड यांसारख्या अनेक आव्हानांमुळे मणिपूर पेटल्याचा दावा माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी केला आहे. कुकी आणि मैतेई या दोन समुदायांमधील संघर्षाचा उल्लेख त्यांनी टाळला.
एक्सवरील पोस्टद्वारे बिरेन सिंह यांनी मणिपूरमध्ये हिंसाचार कशामुळे उफाळून आला याबाबत सांगितले आहे. सिंह यांनी एक प्रकारे राज्यातील गुन्हेगारी रोखण्यात सरकार फेल ठरल्याचीच कबुली दिली आहे. विशेष म्हणजे मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांना त्यांच्या राज्यात मोठय़ा प्रमाणावर अवैधरित्या गावे वसलेली आहेत हे माहीत होते का, असा सवाल करत संगमा यांनाही बिरेन सिंह यांनी लक्ष्य केले आहे. मे 2023मध्ये मैतेई आणि कुकी या दोन समुदायांत वाशिंक संघर्ष उफाळून आला. त्यामुळे झालेल्या हिंसाचारात तब्बल अडीचशे बळी गेले तर हजारो लोक बेघर झाले. त्यानंतर 9 फेब्रुवारी 2025 रोजी पेंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर तासाभरात सिंह यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. अखेर 13 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारने येथे राष्ट्रपती राजवट लागू केली. मणिपूरमध्ये अधूनमधून दोन समुदायांमध्ये संघर्ष उफाळून येत असल्याचे चित्र आहे.
राज्यातील सध्यस्थिती राजकारणामुळे नाही तर गुन्हेगारीमुळे
राज्यात कुठल्याही प्रकारचे राजकारण झालेले नाही किंवा राजकारणामुळे येथे हिंसाचाराची परिस्थिती उद्भवलेली नाही. तर राज्यात वाढलेल्या गुन्हेगारीमुळे मोठय़ा प्रमाणावर अवैध गावे वसली. त्यामुळे अनेक आव्हाने निर्माण झाल्याचे बिरेन सिंह यांनी म्हटले आहे. दिवंगत पी.ए. संगमा यांनी वांशिक तत्त्वावर ईशान्येत मोठ्या प्रमाणावर संघर्ष निर्माण केला. त्यामुळे देशाच्या एकतेला धोका निर्माण झाला आणि संपूर्ण राज्यात अंतर्गत अस्थिरता निर्माण झाल्याचा दावाही सिंह यांनी केला आहे. दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कोनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीने भाजप्रणीत सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. मणिपूरमधील वांशिक संघर्ष थांबवून राज्यात शांतता निर्माण करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला होता.