मणिपूरवर आता नैसर्गिक संकट; सहा नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, दोघांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत

manipur-flood-situation

मणिपूर गेल्या वर्षभरापासून राज्यातील दोन समाजातील वादानंतर चर्चेत आलं. इथल्या हिंसाचाराच्या घटनांनी संपूर्ण देशाला हादरवलं आहे. अद्यापही तिथली सामाजिक परिस्थिती फारशी सुधारलेली नसतानाच आता नैसर्गिक संकटानं मणिपूरला घेरलं आहे. हिंदुस्थानच्या ईशान्येकडील राज्यात पावसाचं प्रमाण खूप जास्त असून मणिपूरमध्ये राजधानीसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

राज्याचे जलसंपदा, मदत आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अवांगबो न्यूमाई यांनी बुधवारी माहिती दिली आहे की, इंफाळमधील पुराचा परिणाम पाहायला मिळण्यामागे ओव्हरफ्लो किंवा गळती किंवा नदीचं पात्र कमी पडून पाणी शिरणे, अशी कारणं असू शकतात.

अवांगबो न्यूमाई यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘इम्फाळमधील बहुतेक ठिकाणे असुरक्षित आहेत कारण सहा प्रमुख नद्यांसह सर्व नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत आणि पाणी विविध भागात शिरत आहे’.

पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवणे हे राज्य सरकारचे पहिले प्राधान्य आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. इम्फाळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि आतापर्यंत 2,000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आलं आहे. तर उर्वरित लोकांना मदत शिबिरांमध्ये हलवण्यात आले आहे.

राज्यात पूरग्रस्तांच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे. मात्र त्याचा निश्चित आकडा परिस्थिती सामान्य झाल्यावरच समोर येईल. दरम्यान वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. न्यूमाई म्हणाले की, सेनापती येथे एका व्यक्तीचा भूस्खलनामुळे मृत्यू झाला तर दुसऱ्या व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला आहे.