![CM Biren Singh](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/CM-Biren-Singh-696x447.jpg)
अपहरण, हत्या, जाळपोळ, बलात्कार अशा भयंकर घटनांमुळे मणिपूर अक्षरशः होरपळून निघाले. गेल्या 21 महिन्यांपासून रस्ते रक्तपाताने माखल्यानंतर आणि अडीचशे निष्पापांचा बळी गेल्यानंतर अखेर भाजप जागा झाला. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी अखेर आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मणिपूरमधील जनतेच्या सन्मानार्थ आणि सेवेखातर राजीनामा देत असल्याचे सिंह यांनी राजीनाम्यात म्हटले आहे. दरम्यान, महिनाभरापूर्वीच त्यांनी मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल आणि शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याबद्दल जनतेची माफी मागितली होती.
राजभवनात जाऊन त्यांनी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे राजीनामा सोपवला. सिंह यांनी आजच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर सायंकाळी राजीनामा दिला. यावेळी सिंह यांच्यासोबत भाजप आणि नागा पीपल्स फ्रंटचे 14 आमदारही राजभवनात उपस्थित होते. शिष्टमंडळात भाजपचे मणिपूर प्रदेशाध्यक्ष ए. शारदा आणि पक्षाचे खासदार संबित पात्राही उपस्थित होते. राज्यातील अशांती आणि हिंसाचारावरून विरोधकांकडून सातत्याने सरकारला धारेवर धरले जात होते. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे 12 आमदारही नेतृत्व बदलासाठी केंद्रीय नेतृत्वावर दबाव टाकत होते. दरम्यान, नव्या मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळण्याचे आदेश राज्यपालांनी दिले.
काँग्रेसच्या दबावामुळेच राजीनामा- राहुल गांधी
सिंह यांनी मणिपूरमध्ये दोन वर्षे फूट पाडली. हिंसाचार, जीवितहानी होऊनही मोदींनी त्यांचे मुख्यमंत्रीपद काढले नाही. जनतेचा वाढता दबाव, काँग्रेसचा अविश्वास ठराव आणि सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आदेशामुळेच त्यांनी राजीनामा दिला, अशा शब्दांत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मोदींनी मणिपूरला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
काँग्रेस आणणार होती अविश्वास प्रस्ताव
बिरेन सिंह सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष केशम मेघचंद्र यांनी म्हटले होते. त्यानंतर सिंह यांनी सरकारमधील सहकारी पक्षांच्या आमदारांची मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयातील दालनात शनिवारी बैठक घेतली होती व बैठकीनंतर पुन्हा एकदा जनतेची माफी मागितली होती.
मोदी एकदाही फिरकले नाहीत
मणिपूर धगधगत असताना 21 महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला एकदाही फिरकले नाहीत. विरोधकांनी याच मुद्दय़ावरून मणिपूर सरकार आणि केंद्र सरकारला वारंवार धारेवर धरूनही मोदींनी सातत्याने दुर्लक्षच केले. संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला असता मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल बोलण्याऐवजी उलट राजकारणासाठी मणिपूरच्या भूमीचा वापर करू नका, असे मोदी विरोधकांना म्हणाले.
- मैतेईंना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीवरून 3 मे 2023पासून मणिपुरात हिंसाचार सुरू आहे. आतापर्यंत 600 दिवसांत 250 बळी तर 1100 जण जखमी, पाच जिल्हे हिंसाचाराने पोळले.
हिंसाचाराच्या 865 घटना
- मे 2023 ते ऑक्टोबर 2023 – 408
- नोव्हेंबर 2023 ते एप्रिल 2024 – 345
- मे 2024 ते जानेवारी 2025 – 112