मणिपूरमध्ये दोन वेळा कोसळलेला पूल नव्याने बांधला, आता तिसऱ्यांदा कोसळून एकाचा मृत्यू

manipur-bridge

इम्फाळ नदीवरील बेली पूल रविवारी सकाळी कोसळला. या पुलावरून जाणारा ट्रक नदी पात्रात पडून एकाचा मृत्यू झाला आहे.

ही घटना रविवारी सकाळी 6 च्या सुमारास इंफाळ पश्चिम येथील वांगोई पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचं सांगण्यात आलं आहे.

जळाऊ लाकडांनी भरलेल्या ट्रकने नव्याने बांधलेला बेली ब्रिज ओलांडण्याचा प्रयत्न केला असता पुलाचा कठडा कोसळला आणि आतील चार जणांसह ट्रक नदीत पडला.

या अपघातावेळी तीन जण ट्रकमधून उडी मारण्यात यशस्वी झाले, तर चालक, मोहम्मद बोरजाओ हा ट्रकमध्ये अडकला आणि त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

महापालिका प्रशासन, गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री वाय खेमचंद यांनी आमदार खुराईजाम लोकेन यांच्यासह घटनास्थळाला भेट दिली.

खेमचंद म्हणाले की, ‘तांत्रिक दोषांमुळे’ पूल कोसळला असावा आणि या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

या अहवालाच्या आधारे दोषीवर आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असं मंत्री खेमचंद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसंच अधिकारी पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू करतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

वांगोई पोलीस स्टेशन, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि मणिपूर अग्निशमन दलाच्या एकत्रित बचाव मोहिमेद्वारे चालकाचा मृतदेह बाहेर काढला.

गंभीर बाब म्हणजे हाच पूल यापूर्वी दोनदा कोसळला होता. मात्र त्यावेळी त्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.