वक्फवर 14 तास तर मणिपूरवर फक्त 41 मिनिटे चर्चा, गृहमंत्री केंद्र आणि राज्य सरकारचे अपयश लपवत आहेत; विरोधकांचा संताप

वक्फ सुधारणा विधेयकावर संसदेच्या दोन्ही सभागृहांत तब्बल 14 तास चर्चा करण्यात आली. परंतु 22 महिने रस्ते रक्ताने माखले, जिथे वांशिक संघर्षात 260 जणांना जीव गमवावा लागला त्या मणिपूरमधील अशांततेवर, रक्तरंजित संघर्षावर, हिंसाचारावर रात्रीच्या अंधारात केवळ 41 मिनिटेच चर्चा झाली. यावरून केंद्रीय गृह मंत्री अमित शहा हे केंद्र आणि राज्य सरकारचे मणिपूरमधील अपयश लपवत आहेत, अशा शब्दांत काँग्रेससह विरोधकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. भाजपला रात्रीच्या अंधारात काम करायला आवडते, असा सणसणीत टोलाही लगावला.

लोकसभेत आपल्याकडे पूर्ण दिवस होता. दुसऱ्या दिवशी दिवसभर मणिपूरवर चर्चा होऊ शकत होती. परंतु भाजपला रात्रीच्या अंधारात काम करणे आवडते. मणिपूरबद्दल भाजपने खोटे पसरवले. मणिपूरमध्ये गृह मंत्र्यांचे अपयश लपवण्याचा प्रयत्न केला गेला. रात्री अडीच वाजता चर्चा करण्यात आली, जेणेकरून मणिपूरमधील जनता चर्चा ऐकू शकणार नाही, असा आरोप काँग्रेसने एक्सवरून केला आहे. राज्यसभेत चर्चेसाठी 3 तास निश्चित करण्यात आले होते. परंतु केवळ 41 मिनिटेच चर्चा झाली, असे काँग्रेसने म्हटले आहे.

पंतप्रधान थायलंडला गेले आहेत, गृह मंत्री छत्तीसगडला चाललेत 

मणिपूरमध्ये जळत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंडला गेले आहेत आणि गृह मंत्री अमित शहा छत्तीसगडला चाललेत,  भाजपामध्ये हुकूमशाहीचा डीएनए असून ते सातत्याने लोकशाहीची हत्या करत आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

मोदींनी मणिपूरला भेट द्यावी

मणिपूरमध्ये शांतता राखण्यात आणि तेथील हिंसाचार रोखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरला भेट द्यावी आणि तेथे कायदा तसेच सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी मागणी आज विरोधी पक्षांनी लावून धरली. मणिपूरमधील हिंसाचाराची चौकशी व्हावी आणि याबाबत संसदेत श्वेतपत्रिका सादर करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखू शकले नाहीत. राज्यात पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवावी, येथे राष्ट्रपती राजवट लागू करणे हा त्यावरचा उपाय नाही, असेही विरोधकांनी म्हटले आहे.

पहाटे 4 वाजेपर्यंत कामकाज

मध्यरात्री अडीच वाजण्याच्या आधी वक्फ विधेयकावरील प्रक्रिया संपली होती. रात्री पावणेतीन वाजण्याच्या सुमारास मणिपूरच्या मुद्दय़ावर चर्चेला सुरुवात झाली. पहाटे 4 वाजेपर्यंत कामकाज सुरू होते. केंद्रीय गृह मंत्र्यांनी राज्यसभेत दोन महिन्यांच्या आत राष्ट्रपती राजवटीची पुष्टी करण्याचा वैधानिक ठराव चर्चेसाठी आणि मंजूर करण्यासाठी सादर केला. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास आवाजी मतदानाने ठराव मंजूर करण्यात आला.

11 दहशतवाद्यांना अटक

मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवादी कारवाया करणाऱ्या 11 दहशतवाद्यांना अटक केली. दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठाही हस्तगत करण्यात आला आहे.