>>प्रसाद नायगावकर
विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आश्वासनांची खैरात व सवंग घोषणा केल्या आहेत. मात्र, घोषणेप्रमाणे प्रत्यक्ष कृती करण्यासाठी शासनाकडे आर्थिक तजवीज आहे का? असा सवाल करत गोव्याचे प्रभारी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पावर जळजळीत टीका केली आहे.
“लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजप, शिंदे गट व अजित पवार राष्ट्रवादी मित्रपक्ष महायुतीला पूर्णत: नाकारले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या दमणशाही वृत्तीचा मतदारांनी मतपेटीतून समाचार घेतला. राज्यात काँग्रेस, उद्धव ठाकरे व शरद पवार राष्ट्रवादी पक्षाला जनतेने कौल दिला आहे. त्यामुळेच भविष्य ओळखून राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना सत्ताधाऱ्यांनी जनतेला खूष करण्यासाठी व आगामी विधानसभा डोळ्यापुढे ठेवून आश्वासनांची खैरात व सवंग घोषणा केल्या आहे. मात्र, घोषणेप्रमाणे प्रत्यक्ष कृती करण्यासाठी शासनाकडे आर्थिक तजवीज आहे का? याबाबत कुठेही लक्ष दिले नाही. एकंदरीत राज्याचा हा अर्थसंकल्प म्हणजे पावसाळ्यात फसव्या घोषणांची अतिवृष्टी होय.” अशी जळजळीत टीका माणिकराव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे.