
शेतकऱ्यांविरोधात बेताल वक्तव्य करून त्यांची क्रूरचेष्टा करणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. कर्जमाफीचे पैसे शेतकरी साखरपुडा आणि लग्नासाठी खर्च करतात, असे विधान करणाऱ्या कृषिमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भिवंडी, उरण आणि पनवेलमध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात आले. कोकाटे.. कोकाटे.. राजीनामा द्या मुकाट्याने अशा घोषणादेखील शिवसैनिकांनी दिल्या.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या नाशिक दौऱ्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी कर्जमाफीच्या पैशातून तुम्ही साखरपुडा, लग्न करता का, असा अजब प्रश्न विचारला. त्यावर शेतकरीदेखील संतप्त झाले. आपली चूक कळल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी माफी मागितली तरी सरकारच्या बेफिकिरीविरोधात आता शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. कोकाटे यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी कृषिमंत्र्यांचा निषेध केला. यावेळी उपमहानगर संघटक आत्माराम गावंड, शहरप्रमुख प्रवीण जाधव यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. भिवंडीत जिल्हाप्रमुख मनोज गगे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी अमित सानप यांना निवेदन देण्यात आले. उरणमध्ये शहर शाखेसमोर रायगड जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवून कृषिमंत्र्यांचा निषेध केला.