
चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड सिमेंट प्रकल्पामुळे परिसरातील सुपीक जमीन नापीक झाल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे माणिकगड सिमेंट प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाचे पुन्हा एक नवीन युनिट इथे सुरू झाले आहे. गडचांदूर शहरात हा प्रकल्प असून, आजूबाजूला थुटरा आणि गोपालपूर या गावांची शेती आहे. कापूस, सोयाबीन, तूर ही महत्वाची पिके इथे घेतली जातात. मात्र गेल्या काही वर्षापासून शेती करणे कठीण होत आहे. सिमेंट प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या धूळीमुळे जमीन नापीक झाली आहे.
दिवसरात्र या प्रकल्पात सिमेंट उत्पादन सुरू असते. त्यामुळे प्रकल्पाच्या चिमण्यातून सारखी धूळ बाहेर पडते आणि ती आजूबाजूच्या गावात आणि शेतपिकांवर पडते. याशिवाय प्रकल्पातून जे दूषित पाणी बाहेर सोडले जाते त्यात सिमेंटचे प्रमाण असल्याने शेतीचा पृष्ठभाग कडक झाला असून, धुळीने काळी माती पांढरी झाली आहे. या प्रदूषणाचा मोठा परिणाम पिकांवर आणि जमिनीवर झाला आहे. सोबतच आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. जे काही पीक घेतले जाते, त्याचे उत्पादन घटले आहे. शिवाय गुणवत्तेवरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग त्रस्त आहे. शेतात कितीही मेहनत घेतली तरी हाती काहीच लागत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
या प्रदूषणामुळे सुमारे शंभर हेक्टरवर शेती बाधित झाली आहे. शेतात आणि पिकांवर धुळीचे प्रमाण एवढे आहे की, शेतमजूरसुद्धा इथे काम करायला तयार नाहीत. धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रकल्पाकडून कोणतेही प्रयत्न होत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यापेक्षा कंपनीने आमची जमीन घेऊन मोबदला द्यावा, अशी मागणी ते करत आहेत.