
ढगाळ हवामान, तापमानातील चढ-उतार आणि वातावरणातील बदल यामुळे यंदा आंबा उत्पादनावर संकट कोसळले असून डहाणू व तलासरी भागातील आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे आंबा फळांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी फळांना कागदी पिशव्यांचे आवरण लावण्यास सुरुवात केली आहे. या सुरक्षा कवचाने ऊन, वारा, पक्षी आणि कीटकांपासून संरक्षण मिळत आहे. मात्र असे असले तरी खर्चात वाढ होत असल्याने बागायतदारांचे आर्थिक बजेट
कोलमडले आहे.
गेल्या काही दिवसात हवामानात अचानक बदल झाल्यामुळे दिवसाच्या तापमानात वाढ, तर पहाटे थंडी अशी विषम स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी फळगळ आणि रोगराई वाढू लागली आहे. यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी संरक्षणात्मक उपाय म्हणून कागदी पिशव्यांचा वापर वाढवला जात आहे. डहाणूतील आंबा उत्पादक शेतकरी सुदीप म्हात्रे यांनी या तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून दिले आहे.
फळांचे पोषण टिकून राहते
साध्या कागदी पिशव्या बाजारात फक्त 1 रुपयाला उपलब्ध असून, त्या सहज वापरता येतात. 25-20 सेंमी आकाराच्या या पिशव्या आहेत. या पिशव्या फळांना दवबिंदू, पी, बंद, परमामी आणि कडक उन्हापासून संरक्षण देतात. त्याचबरोबर पिशव्या वापरल्यास फळगळ कमी होते. फळांचा रंग, वजन आणि गोडी वाढते. कीटकनाशक फवारणीची गरज कमी होते. एकसमान रंग निर्माण होतो. फळांचे पोषण टिकून राहते. तसेच सेंद्रिय उत्पादनास चालना मिळते.
पालघर जिल्ह्यात आंबा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विक्रीसाठी येतात. त्याआधीच पिशव्या चढवल्यास उष्णतेपासून होणारे नुकसान टाळता येते. कागदी पिशव्यांचा वापर हे आंबा उत्पादकांसाठी एक योग्य आणि फायदेशीर पाऊल ठरेल. – प्रशांत जाधव, आंबा उत्पादक