विदेशी आणि फक्त गोवा राज्यात विक्रीकरिता असलेल्या विदेशी दारू असलेला पिकअप उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडला. मोरगाव – सुपे रस्त्यावर मुर्टी गावाच्या हद्दीत केलेल्या या कारवाईत 12 लाख 61 हजारांच्या दारूच्या बाटल्या आणि इतर असा 30 लाखांचा मुद्देमाल उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. कुणाला संशय येऊ नये म्हणून आरोपींनी पिकअपमध्ये मागे आंब्याच्या पेटय़ा आणि पुढील बाजूला दारूचे बॉक्स ठेवले होते. पुष्पा स्टाईल सुरू असलेली ही वाहतूक उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणून चौघांना अटक केली आहे.
नामदेव हरिभाऊ खैरे, संदीप बबन सानप, गोरख भगवान पालवे, महेश गुलाबराव औताडे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गोव्याहून नगरच्या दिशेने हे पिकअप वाहन चालले होते. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत, उपअधीक्षक उत्तम शिंदे, सुजित पाटील, संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक हद्दीत गस्तीवर होते. यादरम्यान मोरगाव भागातून दारू वाहतूक होणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार उत्पादन शुल्कच्या दौंड विभागाने सापळा रचला. मुर्टी गावच्या हद्दीत एक चारचाकी आणि एका पिकअपला थांबविण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पथकाने पाहणी केली असता पिकअपमध्ये दारूचा साठा आढळून आला. दारू वाहतुकीची शंका येऊ नये, यासाठी आरोपींनी पिकअपमध्ये पाठीमागच्या बाजूला आंब्याच्या पेटय़ा ठेवल्या होत्या. मात्र, पथकाने सर्व पेटय़ा बाहेर काढल्यानंतर पाठीमागील बाजूस दारूचे बॉक्स आढळून आले. त्यानुसार गुन्हा दाखल करून चौघांना अटक करण्यात आली आहे.