एक ना धड भाराभर चिंध्या

>> मंगेश वरवडेकर

जिंदगी की यहीं रित है, हार के बाद ही जीत है… आपण हरून हरून थकलो तरी विजयाचे क्षण काही वाटेला येत नाहीत. धक्के बसणे सुरूच आहेत. मंगळवारी विनेश पह्गाटच्या विजयाचा जल्लोष अवघ्या हिंदुस्थानात सुरू होता आणि सकाळ होता होता ती काळरात्र झाली. त्यानंतर जे घडतंय ते अवघं जग पाहतंय. तिच्या 50 किलो वजनात 100 ग्रॅम अधिक वजनासाठी कुणाकुणावर खापर पह्डले जाईल ते हळूहळू समोर येईलच. पण ऑलिम्पिकमध्ये आपल्याला हाती घोर निराशा आलीय. विजयाला सर्व माफ असते आणि पराभवाला कुणी मायबाप नसतो. विजय तर आपल्या झोळीत पडलेला नाहीय. त्यामुळे आता पराभवाचे पोस्टमॉर्टम तर होणारच.

हिंदुस्थानचा 117 खेळाडूंचा संघ ऑलिम्पिकसाठी उतरला तेव्हा वाटलं यावेळी आपण टोकियोपार करणार. म्हणजे किमान टोकियो ऑलिम्पिकच्या दुहेरी यश आपले खेळाडू मिळवतील, असा आवाज घुमला होता. पण आपलं ते स्वप्न मातीमोल होतेय. हिंदुस्थानचे हे अपयश पचवणे अशक्य झालेय. मात्र दुसरीकडे आपल्या शेजारील आशियाई देश जपान, कोरिया आणि चीनचे यश पाहून खूप  बरे वाटतेय. तसेही चीन हा अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देतोय. अधूनमधून धक्काही देतोय. त्यामुळे चीनशी आपली तुलना होऊच शकत नाही. पण जपान-कोरियाच्या यशाला जवळून न्याहाळताना दिसले की, हे देश आपल्या योग्यतेच्या खेळांनाच प्राधान्य देतेय. ऑलिम्पिकच्या सर्व खेळात हे आपली ताकद व्यर्थ नाही करत. ते फक्त आपल्या हक्काच्या खेळात जीव तोडून कामगिरी करताहेत. जपानबद्दल सांगायचे झालं तर त्यांनी ज्युडो, तलवारबाजी, तायक्वांदो, बॅडमिंटन या खेळांवर आपले सारे लक्ष्य पेंद्रित केलेय, तर दुसरीकडे कोरियाने तिरंदाजी, बॅडमिंटन, नेमबाजी आणि तायक्वांदो या खेळांमध्येच आपले जास्तीत जास्त खेळाडू उतरवलेत. त्यांना आपल्या खेळाडूंची क्षमता आणि योग्यता माहित्येय. केवळ चार-पाच खेळांवर पह्कस करणाऱया या छोटय़ा देशांनी दहापेक्षा अधिक सुवर्ण जिंकत आपल्या पदकांची संख्या 30 च्या जवळपास नेलीय. त्यांचेही पथक हिंदुस्थानच्या संख्येइतकेच आहे, पण त्यांच्या पदकांची संख्या हिंदुस्थानच्या पैकपटीने अधिक आहे. ते जितकी मेहनत घेतात, तितकीच मेहनत आपले खेळाडूही घेतात. मग आपले खेळाडू मागे का आहेत, हा प्रश्न तर पडणारच ना. जर जगाच्या पाठीवर अनेक प्रगत देश मोजक्याच खेळांत खेळण्याचा फॉर्म्युला वापरत आहेत तर हिंदुस्थानची ऑलिम्पिक रणनीती वेगळी आहे का?

आपण स्वतःला नेमबाजी, हॉकी, तिरंदाजी, बॅडमिंटन, कुस्ती या खेळात बलशाली मानतो. पण त्याखेरीज अॅथलेटिक्सचे अनेक क्रीडा प्रकार आहेत, ज्यातही आपले खेळाडू चांगले यश मिळवत असल्यामुळे आपले काहीसे लक्ष त्याकडेही वळवल्याचे समोर आलेय. एवढेच नव्हे तर आणखीही दहाएक खेळ असे आहेत जिथे हिंदुस्थानी खेळाडू आपले नशीब आजमावत आहेत. पण पॅरिस ऑलिम्पिकची रडकथा पाहिल्यावर हिंदुस्थानचे शेकडो खेळाडू केवळ पर्यटनाला गेल्याचच समोर आलेय. त्यांना आपण ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालोय, हेच खूप भारी वाटतेय. त्यामुळे हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके खेळाडू उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलेत. त्यापैकी तीन प्रकारात आपण कांस्य जिंकले. तिन्ही पदके नेमबाजीत आहेत हे वेगळे सांगायला नको.

पॅरिस ऑलिम्पिकमधील अपयशानंतर हिंदुस्थानच्या क्रीडाधोरणाचे पोस्टमॉर्टम व्हायलाच हवे. कोणताही एकही खेळ धड नसताना ज्या भाराभर चिंध्या बांधून आपल्या पथकाची संख्या मोठी करण्यात आपण धन्यता मानतो, हे कुठेतरी थांबायला हवं. जो फॉर्म्युला युरोपातील छोटे-छोटे देश आणि जपान-कोरियासारखे देश प्रत्यक्षात आजमावत आहेत. त्या धर्तीवर आपले संघटक-संघटना प्रामाणिकपणे आपले अभियान राबवत आहेत का? हिंदुस्थानात गुणवान खेळाडूंची खाण असल्याचे म्हटले जाते, मग ती गुणवत्ता ऑलिम्पिकच्या स्टेजपर्यंत का पोहोचत नाही? की त्यांना पोहचू देत नाही? आपल्या सिस्टममध्ये कुठेतरी मोठा लोच्या आहे. आपले एकही धड नाही आणि भाराभर चिंध्या बांधण्याचा प्रकार आता थांबवायला हवा. जसे अर्जुनाचे लक्ष्य माशाचा डोळा आहे तसेच आपलेही लक्ष्य पदकावर असायला हवे. पॅरिस ऑलिम्पिक तर आता संपल्यातच जमा आहे. तरीही काही आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील अशी अपेक्षा आहे, पण लॉस एंजिल्सची तयारी नव्या रणनीतीसह आतापासून सुरू करायला हवी.