बोनजॉर पॅरिस – परीसस्पर्श होऊ दे!

>>मंगेश वरवडेकर

पोहोचलो एकदाचं. पॅरिसस्पर्श केला एकदाचा. पंढरीची वारी असो किंवा साईंचा दरबार… तिथे फक्त तेच पोहोचतात, ज्यांना माऊली अन् बाबा बोलावतात. हे डिक्टो तसंच आहे, शिर्डी वही आते है, जिन्हें बाबा बुलाते है सारखं. मलाही ऑलिम्पिककडून बोलावणं आलं आणि मी तेथे पोहोचलोय. प्रवास निश्चितच विमानासारखा सुस्साट निश्चितच नव्हता. असंख्य अडथळ्यांची शर्यत होती.

मीच काय, ऑलिम्पिक गाठणाऱ्या प्रत्येकाची एकच इच्छा असते, एकदा तरी ऑलिम्पिकचा भाग बनूया. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणं हे अद्भुत आहेच; पण नुसतं ऑलिम्पिकमध्ये खेळणेही नशिबाची अन् मेहनतीची गोष्ट असते. आपल्या हिंदुस्थानातील लाखो खेळाडूंसाठी आजही ऑलिम्पिकमध्ये नुसतं खेळणं एक स्वप्नच आहे. त्याला स्वप्नच म्हणावं लागणार. आता कुठे आपण मेडल्स जिंकायला लागलोय. अजून हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके सुवर्णक्षणही आपल्या देशाच्या वाट्याला आलेले नाहीत. आजवर आपल्या खेळाडूंनी सोनं जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केलेत; पण प्रयत्नांना सोनेरी यश लाभत नव्हते. आता परिस्थिती किंचित वेगळी असावी.

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या 117 खेळाडूंपैकी सर्वांच्या मनात देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द ओसंडून वाहतेय. त्यांच्या मेहनतीला पदकांचा टिळा लागणार की नाही याची कल्पना नाही. मात्र, ज्या जिद्दीने मैदानात उतरण्याची तयारी करून त्यांनी पॅरिस गाठलेय, त्यावरून पॅरिसमध्ये काहीतरी भन्नाट घडणार हे नक्कीच वाटतेय. क्रीडागावात आपल्या हिंदुस्थानी ऑलिम्पिकवीरांचा आत्मविश्वास पाहून छाती अभिमानाने अक्षरशः फुगलीय. प्रत्यक्ष स्पर्धा सुरू झाल्यानंतर प्रत्येक क्षण सोनेरी ठरू दे हीच इच्छा आहे. हीच अपेक्षा आहे.

टोकियोत आपल्या मेडल्सची संख्या सात होती. पॅरिसमध्ये हा अंक त्यापेक्षा निश्चित जास्त असेल. अशीच देहबोली खेळाडू आणि सहकारी सदस्यांची दिसतेय. यापूर्वी आपल्याला पदकांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहावी लागायची. आपण पहिले मेडल कधी जिंकणार, याकडे अब्जावधी हिंदुस्थानींच्या नजरा खिळलेल्या असायच्या. मात्र, आता तसे होणार नाही. हिंदुस्थानच्या 21 नेमबाजांनी आपला पदकांवर आधीपासूनच नेम धरलाय. तो पहिल्याच दिवशी लागला तर कुणाला आश्चर्य वाटणार नाही, अशी आपली टीम अचूक आहे. नेमबाजीनंतर कुस्ती, मुष्टियुद्ध, बॅडमिंटन हे वैयक्तिक खेळ जोशात आहेत. जोरात आहेत. पण सर्वांचे लक्ष वेधलेय ते भालाफेकपटू नीरज चोप्राने. हिंदुस्थानचा हा गोल्डन बॉय पुन्हा एकदा सुवर्णभाला फेक करील, असा विश्वास आहे. नीरजबरोबर आपले आणखी 28 अॅथलीट पदकांसाठी ‘खेलेंगे हम जी जानसे’ म्हणताहेत. हा अतिआत्मविश्वास नाहीये. दृढविश्वास आहे. आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये खेळणे हेच आपल्यासाठी मिशन असायचे. आता आपण कात टाकलीय. ऑलिम्पिक मेडल्स जिंकणे आता आपले मिशन झालेय. आपल्या खेळाडूंनी केलेली मेहनत पॅरिसमध्ये दिसेलच. मी तर म्हणेन, हिंदुस्थानच्या 117 खेळाडूंच्या कामगिरीचं पॅरिसमध्ये परीस व्हावं. अन् त्यांच्या परीसस्पर्शाने कामगिरीचं सोनं व्हावं. पॅरिसस्पर्श झालाय, आता परीसस्पर्श होऊ दे. अवघ्या हिंदुस्थानींची मान अभिमानाने उंचावेल, असे ‘जन गण मन’चे सूर अवघ्या पॅरिसमध्ये घुमू देत.  कम ऑन इंडिया !