
बुधवार, 11 सप्टेंबर रोजी गणपती मिरवणुकीत राज्याच्या मंड्या जिल्ह्यात झालेल्या जातीय संघर्षाप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी गुरुवारी 52 जणांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बदारीकोप्पलू गावात गणपती मिरवणूक काढताना काही लोकांवर मशिदीजवळून दगडफेक करण्यात आली. यानंतर मिरवणूक काढणाऱ्या हिंदूंनी देखील प्रत्युत्तर दिलं. यावेळी चांगलीच हाणामारी झाली.
त्यानंतर अनेक हिंदू तरुणांनी पोलीस ठाण्यासमोर गणेश मूर्ती ठेवली आणि न्याय मिळावा यासाठी आंदोलन केलं. तर एका गटानं घडलेल्या घटनेविरोधात आपला संताप व्यक्त करण्यासाठी काही दुकानांना आग लावली आणि टायर जाळले, ज्यामुळे तणाव आणखी वाढला.
काही जणांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे नातेवाईक स्थानिक पोलीस ठाण्यासमोर जमा झाले आणि त्यांच्या सुटकेची मागणी केली.
‘आमच्या लोकांनी काहीही चुकीचे केले नाही. त्यांना कोणतेही कारण नसताना अटक करण्यात आली’, असा आरोप करत एका व्यक्तीने पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या लोकांना सोडण्याची मागणी करताना सांगितले.
दरम्यान, या प्रकरणासंदर्भात लोकांना चौकशीसाठी आणण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘आम्ही त्यांना चौकशीसाठी आणले आहे. ज्यांनी काहीही चुकीचे केले नाही त्यांना सोडून दिले जाईल’, असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पोलिसांनी परिसरात हाय अलर्ट घोषित केला आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 लागू केले आहे.
जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बोलताना कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर म्हणाले, ‘परिस्थिती नियंत्रणात असून परिसरात शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश आलं आहे. गणेश मिरवणुकीत कोणीतरी दगडफेक केली आहे. त्यानंतर 52 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू असून सर्व काही आता नियंत्रणात आहे’.
याआधी गुजरातच्या सुरतमध्ये गणपती मंडपावर कथित दगडफेक केल्याच्या कारणावरून सहा अल्पवयीनांना अटक करण्यात आली होती.