मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला व्हॉट्सअॅपद्वारे धमकीचा संदेश पाठविल्या प्रकरणात वरळी पोलिसांनी यूपीतून एकाला अटक करून आणले आहे. सोमवारी दुपारी वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे एक धमकीचा व्हॉट्सअॅप संदेश आला होता. ताज हॉटेल आणि विमानतळ येथे बॉम्ब ठेवला असल्याचे त्या संदेशात नमूद करण्यात आले होते. दरम्यान तपासाअंती संशयास्पद काहीच आढळून आले नव्हते. मात्र हा संदेश यूपीतून आल्याचे तपासात निष्पन्न होताच मुंबई पोलिसांनी त्याप्रमाणे यूपी पोलिसांशी संपर्क साधून संबंधित तरुणाकडे चौकशी करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर वरळी पोलिसांचे एक पथक आग्य्राला गेले व धमकीचा संदेश पाठविणाऱया तरुणाला पकडून मुंबईत आणण्यात आले.