लग्नाची बोलणी करायला बोलावून तरुणीचा मोबाईल लांबवला, आरोपी श्रीवर्धनमध्ये सापडला

मूव्हज मॅट्रीमोनियल साईटवर ओळख झाल्यानंतर दोघांनी एकमेकांशी लग्न करायची तयारी दर्शवली. मग लग्नाची बोलणी करण्याच्या बहाण्याने तरुणाने तिला घाटकोपर येथील फिनिक्स मॉलमध्ये बोलावले. ठरल्याप्रमाणे मॉलमध्ये भेट झाल्यावर तरुणाने स्वतःचा मोबाईल बंद पडल्याने एक अर्जंट कॉल करण्याच्या बहाण्याने तरुणीचा मोबाईल घेऊन पोबारा केला होता. त्या भामटय़ाला घाटकोपर पोलिसांनी श्रीवर्धन येथे पकडले.

नबिल खान (31) असे आरोपीचे नाव आहे. मूव्हज मॅट्रीमोनियल साईटवर त्याची खालिदा (28) हिच्याशी ओळख झाली. दोघांमध्ये बोलणे झाले आणि एकमेकांनी लग्न करण्याच्या तयारी दाखवली. मग पुढची बोलणी करण्यासाठी नबिलने तिला फिनिक्स मॉलच्या फुड कोर्ट येथे बोलावले. ठरल्याप्रमाणे खालिदा तिच्या मैत्रिणीसह तेथे गेली. लग्नाची बोलणी सुरू असताना नाबिल खान याने त्याच्या मोबाईलमध्ये चार्ंजग नसल्याचे सांगत खालिदाचा सॅमसंग एस 23 फोन कॉल करण्यासाठी मागितला. फोन हातात दिल्यानंतर नबिलने मोबाईलमधील तिचे सिमकार्ड काढून आपले सिम टाकले. मग बोलण्याचा बहाणा करत तेथून तो पसार झाला. आपली फसवणुक झाल्याचे कळताच खालिदाने घाटकोपर पोलिसांत तक्रार दिली.