290 किमीपर्यंत तरुणाचा जीवघेणा रेल्वे प्रवास

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका तरुणाने चक्क रेल्वेच्या चाकांजवळ बसून तब्बल 290 किलोमीटर पर्यंत धक्कादायक प्रवास केला. पुण्याकडे येणारी दानापूर एक्स्प्रेस ही गाडी जबलपूर स्थानकावर उभी असताना रेल्वे कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाली. कर्मचारी काही तांत्रिक काम करत असताना संबंधित तरुण त्यांच्या निदर्शनास आला. एका रेल्वे कर्मचाऱ्याने तरुणाला एसी डब्याच्या खाली झोपलेल्या अवस्थेत पाहिले. मग जबरदस्तीने त्याला बाहेर काढण्यात आले. त्याची चौकशी केली असता इटारसी स्थानकापासून त्याने असा जीवघेणा प्रवास केल्याचे सांगितले. तरुणाच्या या प्रवासामुळे रेल्वे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचीन्ह उपस्थित केले जात आहेत. तरुणाने जीव धोक्यात टाकून तब्बल 290 किलोमीटरचा प्रवास केला. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या तरुणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून, अनेकांनी यावर कमेंट केल्या.