आजारपणाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

कुटुंबासह गावातील सर्वजण बकरी ईद सण साजरा असताना राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथील 28 वर्षीय विवाहित तरुणाने सोमवारी सकाळी टाकळीमिया येथील रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सणाच्या दिवशी या तरुणाने आत्महत्या केल्याने कुटुंबासह गाव दुःखाच्या डोंगरात बुडाले. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे आसिफ आयुब पठाण असे नाव असुन आजार पणाला कंटाळून त्याने आत्महत्या केलेल्याचे समोर आले आहे.

मुसळवाडी ता. राहुरी येथील 28 वर्ष विवाहित तरुण आसिफ आयुब पठाण याने ऐन बकरी ईद सणाच्या दिवशीच आपली जीवनयात्रा संपविली. सोमवारी सकाळी 6 च्या सुमारास टाकळीमिया रेल्वेस्थानक परिसरात येऊन धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. यानंतर स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली. घटनास्थळी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राहुल यादव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह देवळाली प्रवरातील रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. दुपारी शोकाकुल वातावरणात आयुब याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत आसिफ याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. आसिफ हा हॉटेलात आचारी काम करून आपली उपजीविका चालवत होता. आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती चर्चेतून समजते. मात्र पोलीस तपासात आधिक माहिती उजेडात येणार आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमंत आव्हाड हे करीत आहेत.