आठ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दाखल खटल्यातील आरोपी चंदनकुमार रामकुमार, (वय 28, रा. टिकेटगंज, ता. फत्तेपूर, जि. बाराबंकी, उत्तर प्रदेश, सध्या रा. बीटीआरनगर) यास दोषी धरून विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी 20 वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली.
ऑगस्ट 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये फिर्यादीच्या आठ वर्षे वय असणाऱया मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून त्यास आरोपीने त्याच्या मोबाईलवरून अश्लिल पोर्नोग्राफीक व्हिडीओ दाखवून लैंगिक छळवणूक करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकिलांचा युक्तिवाद तसेच न्यायालयापुढे आलेला पुरावा ग्राहय़ धरून न्यायालयाने आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यातील सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती उज्ज्वला जितेंद्र थोरात यांनी काम पाहिले. पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके यांनी तपास केला.