नार्कोटिक्सच्या गुन्ह्यात अटकेची भीती दाखवून तरुणाकडून पैसे उकळल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी महिलेसह तीन जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार तरुण हा नवी मुंबई येथे राहतो. तीन दिवसांपूर्वी त्याला एक महिला गोरेगाव पूर्वच्या ओबेरॉय मॉल परिसरात भेटली. तिने तक्रारदार याला त्याचा सिम नंबर कुठून मिळाला अशी विचारणा केली. त्यानंतर महिलेने तरुणाला ओबेरॉय मॉल परिसरात बोलावले. तेथे आल्यावर त्याला पुन्हा तो नंबर कुठून मिळाला अशी विचारणा केली. त्या गाडीत वाहन चालवत असलेल्या चालकाने तो पत्रकार असून महिलेचा सहाय्यक असल्याचे तरुणाला सांगितले. त्यानंतर त्याने तरुणाला गाडीत बसवले. गाडीतून ओबेरॉय मॉल ते वनराई पोलीस ठाणे परिसरात येथे नेले. नार्कोटिक्सच्या गुन्ह्यात आरोपी करू अशी धमकी दिली. त्या गुन्ह्यात अटक करू नये म्हणून त्याने तरुणाकडून 99 हजार रुपये घेतल्यानंतर ते निघून गेले.