
पुण्यात कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका तरुणाने 40 टक्के वेतनवाढीच्या आनंदात बेंगळुरूत नोकरी पत्करली खरी. पण, त्याचा हा आनंद फारकाळ टिकला नाही. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या या तरूणाला अवघ्या वर्षभरातच आपल्या या निर्णयावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. एका नोकरी देणाऱ्या समाजमाध्यमावर व्यक्त होत आपल्या दुःखाला त्याने वाट मोकळी करून दिली. त्याची ही पोस्ट खुपच व्हायरल होत आहे.
तरुण पुण्यात वार्षिक 18 लाखांच्या पॅकेजवर काम करत होता. बेंगळुरूतील एका कंपनीने त्याला वार्षिक 25 लाखांच्या पॅकेजवर नोकरी देऊ केली. एकदम 40 टक्के पगारवाढ मिळते म्हटल्यावर, तात्काळ होकार देत आपला बोऱ्याबिस्तर उचलून तो पुण्यातून बेंगळुरूला शिफ्ट झाला. परंतु, वर्षभरातच आपण पुणे सोडायला नको होते, अशी जाणीव त्याला होऊ लागली.
बेंगळुरूसारख्या शहरात 25 लाखांचे पॅकेज म्हणजे फारच कमी, असा अनुभव त्याला येऊ लागला. 40 टक्के वेतनवाढीमुळे आपण आधीपेक्षा अधिक पैसे बचत करू शकू, असे त्याला वाटले होते. परंतु, पुण्यापेक्षा आयटी सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूत घराचे भाडे अव्वाच्या सव्वा असल्याचा अनुभव त्याला आला. याशिवाय घरमालक तीन ते चार महिन्याचे भाडे आगाऊ घेतात. इथला जेवण आणि वाहतुकीवरील खर्चही खूप जास्त असल्याचे त्याचे म्हणणे आहे. वाहतूक कोंडीने या शहरात घुसमटायला होते ते वेगळे. अशा अनुभवातून जाणाऱ्या या तरुणाला सरतेशेवटी पुण्यात 15 रुपयात मिळणारा वडापाव आठवू लागला आहे. पुण्यातील जीवन तुलनेत कमी कष्टप्रद होते आणि बचतही चांगली होत होती, असा त्याचा अनुभव आहे. त्याच्या या पोस्टवर व्यक्त होत अनेकांनी आपापले पुण्याविषयीचे अनुभव शेअर केले आहेत. पुण्यात काम करून जगण्याचा पुरेसा आनंदही घेता येतो. बेंगळुरूत मिळणाऱ्या जास्तीच्या पैशापेक्षा पुण्यात हे संतुलन साधता येते, असे अनेकांचे म्हणणे आहे.
अर्थात काहींना पुण्यापेक्षा पेक्षा बेंगळुरूत करिअरच्या संधी अधिक आहेत, असेही वाटते. काहींनी 25 लाखांचे पॅकेज थोडेथोडके नसून या तरुणाच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावरूनही सुनावले आहे. पण, एकूणच पुण्याला झुकते माप देण्याऱ्या प्रतिक्रिया पाहता पुणेकरांची कॉलर टाईट न होईल तरच नवल.