
कानपूरमध्ये एक रंजक घटना घडलीय. एका सायबर ठकाला एक महाठक भेटला आणि त्याने 10 हजार रुपयांना सायबर ठकाला गंडवले आहे. 6 मार्च रोजी भूपेंद्र नावाच्या तरुणाला एक कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपण सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. भूपेंद्रविरोधात एफआयआर दाखल झाल्याचे त्याने सांगितले.
भूपेंद्रला घाबरविण्यासाठी काही फोटो आणि व्हिडीओदेखील पाठवले. तसेच या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी 16 हजार रुपयांची मागणी केली. भूपेंद्रला या सगळ्या प्रकाराचा संशय आला. भूपेंद्रने सायबर चोराला सांगितले की, त्याच्याकडे एक सोन्याची चेन आहे, ती विकून तो त्याला पैसे देईल. त्यासाठी त्याला तीन हजार रुपयांची गरज आहे. त्याने तीन हजार रुपये भूपेंद्रच्या अकाऊंटवर ट्रान्स्फर केले. त्याच वेळी भूपेंद्रने आपल्या एका मित्राला ज्वेलर बनवून सायबर चोराशी बोलायला सांगितले. अशा पद्धतीने गोड गोड बोलून सायबर चोराकडून एकूण 10 हजार रुपये आपल्या खात्यात ट्रान्स्फर करून घेतले.