Nayab Singh Saini – थेट मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याची धमकी, एका आरोपीला अटक

महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले असतानाच भाजपची सत्ता असलेल्या हरियाणातील परिस्थितीही काही वेगळी नाही. येथे नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये बहुमत मिळवून सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांना थेट जिवे मारण्याची धमकी मिळाली होती. याप्रकरणी हरियाणा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

जुलानातील एका व्हॉटसअॅप ग्रुपवर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांना कथितरित्या जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचे नाव अजमेर असे आहे. तो जिंद जिल्ह्यातील देवरार गावचा मूळ रहिवासी आहे. 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणीच्या दिवशी आरोपीने सिंह यांना मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती पोलीस अधिक्षक सुमित कुमार यांनी पीटीआयशी बोलताना दिली.

एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर थेट मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे कळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलत गुन्हा दाखल केला आणि अजमेर याला अटक केली. त्याच्याविरोधात धमकी देणे आणि आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे, असेही सुमित कुमार यांनी सांगितले.

काय दिलेली धमकी?

जुलाना येथील ‘सोमबीर राठी जुलाना हलका’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर 8 ऑक्टोबर रोजी एक धमकीचा मेसेज आला होता. याच दिवशी हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकालही लागणार होता. महात्मा गांधी यांना नथुराम गोडसे याने ज्या प्रकारे गोळी घातली होती त्याच प्रकारे जो कुणी हरियाणाचा मुख्यमंत्री बनेल त्याला गोळी घालणार, असा मेसेज आरोपीने पाठवला होता.

लाडवातून विजय

दरम्यान, नुकत्यात झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवले आणि सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी कुरुक्षेत्र जिल्ह्यातील लाडवा मतदारसंघातून विजय मिळवला. काँग्रेसच्या मेवा सिंह यांनी त्यांना चांगलीच टक्कर दिली. सैनी यांना येथे 70 हजार 177, तर मेवा सिंह यांना 54 हाज 123 मतं मिळाली.