व्हायग्राचं अतिसेवन, अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध अन् हार्ट अटॅकनं मृत्यू, ग्रँटरोडच्या हॉटेलमध्ये काय घडलं?

मुंबईतील ग्रँट रोड परिसरात असणाऱ्या एका हॉटेलमध्ये 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध ठेवताना एका 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. डी.बी. मार्ग पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली असून संजयकुमार तिवारी असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस चौकशीदरम्यान ग्रँट रोडच्या हॉटेलमध्ये नक्की काय घडले हे समोर आले आहे.

अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध ठेवण्यापूर्वी संजयकुमार तिवारीने शक्तीवर्धक गोळ्यांचे सेवन केले होते. शनिवारी रात्री अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध ठेवल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या पोलिसांनी अल्पवयीन मुलीचाही जबाब नोंदवला असून मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून मयताविरोधात पॉस्को आणि विविध भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस चौकशीदरम्यान ग्रँट रोडच्या हॉटेलमध्ये शरीरसंबंध ठेवताना मृत्युमुखी पडलेला संजयकुमार तिवारी हा गुजरातमधील एका डायमंड कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता असे समोर आले. त्याचे लग्नही झालेले असून त्याला 17 वर्षांची एक मुलगीही आहे. मुलीच्या आधारकार्डवरच त्याने पीडित मुलीसोबत हॉटेलमध्ये एन्ट्री केली होती.

संजयकुमार तिवारी मुलीला गुजरातमधून घेऊन आला होता. वडील आजारी असताना संजयकुमार तिवारीने पीडित मुलीच्या कुटुंबाची आर्थिक मदत केली होती. याच बहाण्याने त्याचे तिच्या घरी येणे-जाणेही होते. त्यानंतर तो अल्पवयीन मुलीला मुंबई फिरण्यासाठी घेऊन आला आणि मुलीच्या आधारकार्डवर त्याने तिच्यासोबत हॉटेलमध्ये एन्ट्री केली. तिथे शक्तीवर्धक गोळ्या खाऊन त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर तो बेशुद्ध पडला.

पीडित मुलीने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना याबाबत कळवले. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधत संजयकुमार तिवारीला जे.जे. रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, मुलीबाबत माहिती मिळाल्यानंतर पीडितेची आई मुंबईत आली आणि मयताने खोटे आश्वासन देऊन तिला मुंबईत आणल्याचे सांगितले. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी मयताविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे, असे डी.बी. मार्ग पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘मिंट’ने याबाबत वृत्त दिले आहे.